गतवर्षीच्या आत्महत्यांत मजुरांचे प्रमाण २४ टक्के; तामिळनाडू प्रथम, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 05:47 AM2021-10-30T05:47:36+5:302021-10-30T05:48:34+5:30
Suicide cases in last year : २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे.
नवी दिल्ली : गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांपैकी २४ टक्के लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सात वर्षांपूर्वी जितक्या मजुरांनी आत्महत्या केली होती त्यापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. देशात मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या तामिळनाडूमध्ये केल्या असून त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो.
२०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४.६ टक्के आहे. गेल्या काही वर्षांत मजुरांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यात गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे स्थिती आणखी बिघडली होती. २०१४ साली आत्महत्या केलेल्यांपैकी १२ टक्के लोक मजूर होते. हे प्रमाण २०१५ साली १७.८ टक्के, २०१६ मध्ये १९.२ टक्के, २०१७ मध्ये २२.१ टक्के, २०१८ मध्ये २२.४ टक्के, २०१९ मध्ये २३.४ टक्के इतके होते.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२० साली तामिळनाडूमध्ये ६,४९५ मजुरांनी आत्महत्या केली होती. तर, मध्य प्रदेशमध्ये ४,९४५, महाराष्ट्रात ४,१७६, तेलंगणामध्ये ३,८३१ व गुजरातमध्ये २,७५४ मजुरांनी आत्महत्या केली आहे. अपघातांमुळे होणारे मजुरांचे मृत्यू व आत्महत्या करणारे मजूर यांची वेगवेगळी नोंद ठेवण्यास एनसीआरबीने २०१४ सालापासून सुरुवात केली.
देशात आत्महत्या करणाऱ्या नोंदीची नऊ गटात विभागणी करण्यात येते. रोजंदारीवरील मजुरांप्रमाणेच गृहिणी, शेतकरी, पगारदार तसेच व्यावसायिक, उद्योजक, सेवानिवृत्त याचबरोबर इतर काही गटांतील लोकांच्या आत्महत्यांची स्वतंत्र नोंद करण्यात येते.
आत्महत्या केलेल्या गृहिणींचे प्रमाण १४ टक्के
व्यवसायानुरूप विचार केला तर देशात रोजंदारीवरील मजुरांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर अन्य व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण गृहिणी (१४.६ टक्के), स्वत:चा व्यवसाय असलेले (११.३ टक्के), बेरोजगार (१०.२ टक्के), पगारदार व्यक्ती (९.७ टक्के), विद्यार्थी (८ टक्के), शेतकरी (७ टक्के), सेवानिवृत्त (१ टक्का) व इतर गट (१३.४ टक्के) असे आहे. बेरोजगार व्यक्तींनी आत्महत्या करण्याचे प्रमाण २०१९ रोजी १०.१ टक्के होते ते २०२० साली १०.२ टक्के झाले.