मथुरा हिंसाचारात २४ ठार; शस्त्रे जप्त
By admin | Published: June 4, 2016 03:46 AM2016-06-04T03:46:40+5:302016-06-04T03:46:40+5:30
अतिक्रमण हटवण्यास गेलेले पोलीस आणि कब्जा करणाऱ्या लोकांमध्ये गुरुवारी उडालेल्या भीषण चकमकीत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २४ झाली आहे. मृतांमध्ये एक पोलीस अधीक्षक आणि ठाणेदाराचाही समावेश आहे
मथुरा : अतिक्रमण हटवण्यास गेलेले पोलीस आणि कब्जा करणाऱ्या लोकांमध्ये गुरुवारी उडालेल्या भीषण चकमकीत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २४ झाली आहे. मृतांमध्ये एक पोलीस अधीक्षक आणि ठाणेदाराचाही समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला असून, ३२०पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. तसेच दोन मृत पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. जखमी २३ पोलिसांना रुग्णालयात दाखल केले आहे. जवाहरबाग परिसरात सुमारे ३ हजार लोकांनी २६० एकरापेक्षा जास्त भूखंडावर दोन वर्षांपासून अवैध कब्जा केला होता. केंद्राने उत्तर प्रदेश सरकारकडून घटनेचा अहवाल मागितला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यादव यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून त्यांना संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
चूक झाल्याची कबुली
अतिक्रमणकर्ते आणि पोलिसांतील हिंसक संघर्ष ही प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणेची चूक असल्याची कबुली अखिलेश यादव यांनी दिली. पोलिसांना हल्लेखोरांच्या तयारीबाबत माहिती नव्हती, असे सांगून ते म्हणाले की, पोलिसांनी
संपूर्ण तयारीनिशी आणि सविस्तर माहिती मिळवून तेथे जायला पाहिजे होते. आंदोलनकर्त्यांजवळ एवढे काही असेल याची त्यांना कल्पना नव्हती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांचे पथक अतिक्रमणकर्त्यांना हटविण्यासाठी परिसराची पाहणी करण्यासाठी तेथे पोहोचले असता, अवैध कब्जा करणाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक सुरू केली. त्यात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि ठाणेदार संतोष यादव यांचा मृत्यू झाला.
हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या आणि लाठीमार केला. पण आंदोलनकर्त्यांनी तेथे ठेवलेले गॅस सिलिंडर आणि दारूगोळ्याला आग लावली.
त्यामुळे स्फोट झाले. या हिंसाचारात २२ दंगलखोर ठार झाले असून, यापैकी ११ जण आगीत मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये एक महिलाही आहे. घटनास्थळावरून ४७ पिस्तुले, ६ रायफल्स आणि १७८ काडतुसे ताब्यात घेण्यात आली.