आॅपरेशन आॅलआउट सुरू करताच २४ तासांत ४ अतिरेक्यांना कंठस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:31 AM2018-06-19T06:31:51+5:302018-06-19T06:31:51+5:30
जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने मागे घेताच, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, सोमवारी बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने मागे घेताच, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, सोमवारी बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
शस्त्रसंधी संपल्यानंतर जवानांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे. याशिवाय जवानांनी आज सकाळी बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीमही हाती घेतली आहे. सर्च आॅपरेशन सुरू केले आहे.
रमजानच्या महिन्याच्या काळासाठी केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शस्त्रसंधी जाहीर केली होती. भारतीय सुरक्षा दले या काळात स्वत:हून गोळीबार वा तत्सम कारवाई करणार नाहीत, पण दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यास त्यांना तोडीस तोड उत्तर देतील, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले होते. ईद संपल्यानंतर शस्त्रसंधी संपवत असल्याची घोषणा सरकारने रविवारी केली. त्यानंतर, लगेचच सुरक्षा दलांनी आॅपरेशन आॅलआउट सुरू केले.
बांदिपोरा येथे १४ जून रोजीही सुरक्षा दले व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्या वेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मात्र, त्या कारवाईत एका जवानालाही वीरमरण आले होते.
त्यानंतर, ईदच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी औरंगजेब नावाच्या एका जवानाचे अपहरण करून त्याला ठार मारले होते. त्यामुळे आम्हाला लगेचच कारवाईची परवानगी मिळावी, अशी मागणी सशस्त्र दलाचे जवान करीत होते. याच काळात श्रीनगरमध्ये रायजिंग काश्मीरचे संपादक शुजार बुखारी यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. (वृत्तसंस्था)
>२० अतिरेकी घुसले होते
दहा दिवसांपूर्वी पाकिस्तानातून बांदिपोराच्या जंगलात २० अतिरेकी घुसले, अशी माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. तेव्हापासून या भागात शोधमोहीम सुरू आहे. या घनदाट जंगलात आता हे अतिरेकी दोन-तीनच्या गटांत विभागले असल्याचे कळते, त्यामुळे ही मोहीम कठीण होऊन बसली आहे.
>बिजबेहारा भागातही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना
आज सकाळी मिळताच,
त्या भागाला वेढा घालण्यात आला आहे. तिेथे सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
>अतिरेक्यांनी अपहरण करून ठार मारलेले जवान औरंगजेब यांच्या वडिलांची लष्करप्रमुख ले. जनरल बिपिनकुमार रावत यांनी सोमवारी भेट घेतली.
>अतिरेक्यांचा महिनाभर उच्छाद
शस्त्रसंधीच्या काळात दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात खूपच उच्छाद मांडला होता. त्यांनी या महिनाभरात ग्रेनेडने २0 हल्ले केले व ५0 वेळा दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी हल्ले केले.
या हल्ल्यांमध्ये ४१ जण मरण पावले. त्यात २४ दहशतवाद्यांचाही समावेश होता. बहुतांशी दहशतवादी कुपवाडा जिल्ह्यातच मारले गेले होते.