हे काय? देशातील 24 स्मारके अन् वारसा स्थळे बेपत्ता; पुरातत्त्व विभागाच्या अहवालातून माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 07:15 AM2022-08-10T07:15:00+5:302022-08-10T07:15:09+5:30
संसदेत उपस्थित झाला मुद्दा, पुरातत्त्व विभागाच्या अहवालातून माहिती उघड
नवी दिल्ली : देशातील तब्बल २४ वारसा स्थळे बेपत्ता आहेत. हा मुद्दा संसदेत वारंवार उपस्थित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) त्यांचा शोध सुरू केला आहे. एएसआयने अधिकाऱ्यांना ही स्थळे शोधून काढण्याचे आदेश दिले.
सांस्कृतिक खात्याचे मंत्री जी. किशन रेड्डी यांनी संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. या ऐतिहासिक स्थळांत स्मारक, मंदिर, बौद्ध भग्न वास्तू, कब्रस्तान, मीनार आदींचा समावेश आहे.
बहुतांश स्थळे ही उत्तर प्रदेशातील आहेत. २४ वारसा स्थळांची ही यादी ब्रिटिशकालीन आहे. त्यानंतर अनेक गावे व शहराची नावे बदलली आहेत. खसरा क्रमांक बदलले आहेत. अशा स्थितीत त्यांचा शोध घेणे कठीण आहे, असे एएसआयचे संचालक देवकीनंदन डिमरी यांनी सांगितले. अनेक वारसा स्थळांचे अभिलेख एएसआयला जतन करून ठेवता आले नाहीत. त्यामुळे त्यांचे भौगाेलिक स्थान शोधणे कठीण झाले आहे.
नव्या विधेयकाला विरोध
अनेक वारसा स्थळे पर्यटन स्थळे बनू शकली नाहीत. त्यामुळे स्थानिक लोकांना त्यांचे महत्त्व कळत नाही. अशा स्थितीत ती एखाद्या रस्त्यात येत असतील तर त्यांचे संरक्षण होणे कठीण होते, असे तज्ज्ञांनी सांगितले. ऐतिहासिक स्थळांच्या आसपास बांधकामावरील निर्बंध सैल करण्यासाठी गेल्या जानेवारीत एक विधेयक लोकसभेत मांडले. अनेक खासदारांनी त्याला विरोध केला होता. हे विधेयक आता राज्यसभेत आहे. पुरातत्त्व आणि इतिहासाच्या अभ्यासकांचा या विधेयकाला विरोध आहे.
खोदकामात आढळले पुरातत्त्वीय अवशेष
देशात संरक्षित स्थळांची संख्या ३८६४ एवढी आहे. त्यातील २४ स्थळे गायब आहेत. १४ स्थळांचा नागरीकरण व धरणांमुळे बळी गेला. अल्मोडाचे कुटुम्बरी देवीचे मंदिर बेपत्ता होते. मात्र, ते कोसळल्यानंतर ग्रामस्थ अवशेष घेऊन आले व मंदिर पुरातत्त्वीय नकाशावर आले.