१५ नाही २४ पक्ष सहभागी होणार! विरोधकांची ताकद वाढणार; सोनिया गांधी बंगळुरुतील बैठकीला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 05:55 PM2023-07-12T17:55:07+5:302023-07-12T17:58:54+5:30
Opposition Party Meet in Bangalore: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात असून, पाटणानंतर आता बंगळुरूत बैठक होत आहे.
Opposition Party Meet in Bangalore: सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची पहिली महत्त्वाची बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली होती. आता ही बैठक बंगळुरू येथे होणार आहे. पाटणा येथील बैठकीत सुमारे १५ विरोधी पक्ष सहभागी झाले होते. मात्र, बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीला २४ पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी हजेरी लावू शकतात, असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपविरोधातील पक्षांचे बळ वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. एमडीएमके, केडीएमके, व्हीसीके, आरएसपी, मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणी) हे काही पक्ष आता १७-१८ जुलै रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीत सहभागी होऊ शकतात, असे बोलले जात आहे.
सोनिया गांधी बंगळुरुतील बैठकीला जाणार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना बेंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण पाठवले आहे. १७ जुलै रोजी सर्वांसाठी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बैठकीला सुरुवात होणार आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले होते की, खरगे यांनी विरोधी पक्षनेत्यांना तसेच सोनिया गांधी यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सोनिया गांधी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आम्हाला देण्यात आल्याचे शिवकुमार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कांग्रेस, टीएमसी, डीएमके, आम आदमी पक्ष, जेडीयू, आरजेडी, सीपीएम, सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, समाजवादी पार्टी, नेशनल कॉन्फ्रेंस, पीडीपी, सीपीआई एमएल, जेएमएम, आरएलडी, आरएसपी, आययूएमएल, केरल कांग्रेस एम, वीसीके, एमडीएमके, केडीएमके, केरल कांग्रेस (जे), फॉरर्वड ब्लॉक या पक्षांचे नेते बंगळुरूतील बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. पाटणा येथील झालेल्या बैठकीला १५ विरोधी पक्षांचे २७ नेते उपस्थित राहिले होते.