चेंगराचेंगरीत २४ भाविक ठार
By admin | Published: October 16, 2016 04:39 AM2016-10-16T04:39:34+5:302016-10-16T04:39:34+5:30
उत्तर प्रदेशच्या चंदोली आणि वाराणसी जिल्ह्याच्या सीमेवर बाबा जय गुरुदेव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन २४ जण मृत्युमुखी, तर ५0हून
चंदौली : उत्तर प्रदेशच्या चंदोली आणि वाराणसी जिल्ह्याच्या सीमेवर बाबा जय गुरुदेव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांची चेंगराचेंगरी होऊन २४ जण मृत्युमुखी, तर ५0हून अधिक लोक जखमी झाले. शनिवारी हा प्रकार घडला. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून, त्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५0 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देतानाच, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. (वृत्तसंस्था)
अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी
- चंदौली जिल्ह्यात गंगेच्या किनाऱ्यावर डोमरी गावात बाबा जय गुरुदेव यांच्या जयंतीनिमित्त दोनदिवसीय जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने भाविक वाराणसीच्या पिली कोठी येथून डोमरीकडे जात होते. रस्त्यात राजघाट पुलावरून लोक जात असताना, अचानक चेंगराचेंगरी झाली.
पोलिसांनी सांगितले की, कार्यक्रमाला दोन ते तीन हजार लोक येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले होते. पण त्याहून अधिक लोक आले. त्यामुळे पुलावर गोंधळ उडाला आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. आयोजकांनी येणाऱ्या लोकांची काहीच व्यवस्था न केल्यामुळे हा प्रकार घडला.
- आयोजकांनी म्हटले आहे की, आलेले लोक पुलावरून पुढे सरकत असताना, पोलिसांनी त्यांना मागे ढकलण्यास सुरुवात केली. त्यातून गोंधळ उडाला. मागे असलेल्या लोकांमध्ये पूल कोसळल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.
- जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. वाराणसी हा पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ आहे.