इंजिनियरिंगचे २४ विद्यार्थी वाहून गेले
By admin | Published: June 9, 2014 03:26 AM2014-06-09T03:26:39+5:302014-06-09T03:26:39+5:30
हैदराबादच्या एका इंजिनियरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशची सहल जीवावर बेतली
सिमला/ मंडी : हैदराबादच्या एका इंजिनियरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशची सहल जीवावर बेतली. रविवारी संध्याकाळी मंडीपासून ४० कि.मी. अंतरावर मनाली- किरतपूर राष्ट्रीय महामार्गावर बियास नदीच्या काठावर छायाचित्रे टिपण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा लोंढा आल्याने किमान २४ विद्यार्थी वाहून गेले. लार्जी येथील १२६ मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पातून अचानक पाणी सोडण्यात आल्याने ही दुर्घटना घडली.
मृतांमध्ये १८ विद्यार्थी आणि सहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. नदीत पाणी सोडताना प्रकल्प अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने हा प्रसंग ओढवला. नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाहाचा वेग वाढला होता.
या दुर्घटनेनंतर संतप्त लोकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने केली. बेपत्ता विद्यार्थ्यांच्या शोधासाठी रात्री मोहीम सुरू करण्यात आली मात्र अंधार असल्यामुळे मदतकार्यात बाधा निर्माण झाली. बेपत्ता विद्यार्थी जिवंत सापडण्याची आशा अंधूक झाली आहे.
पाणबुड्यांची मदत घेतली जात आहे. नदीच्या काठावर न गेलेले उर्वरित २० विद्यार्थी बचावले मात्र आपल्या मित्रांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगाने त्यांना जबर धक्का बसला आहे. बेपत्ता विद्यार्थ्यांबाबत माहिती घेतली जात आहे, असे हिमाचलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.आर. मार्डी यांनी सांगितले. या घटनेमुळे देशभरात टिका होत असतांनाच सर्व स्तरातून दु;ख सुध्दा व्यक्त होत आहे.