जेईई-मेन परीक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण; १३ भाषांमध्ये झाली परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 06:59 AM2022-08-09T06:59:37+5:302022-08-09T07:03:11+5:30
जेईई मेन्समध्ये अमरावती येथील श्रेणिक मोहन साकला २९५ गुण मिळवत राज्यातून अव्वल तर देशात ११ व्या स्थानी झळकला आहे.
नवी दिल्ली : इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई-मेन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत २४ विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळविले. ही माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिली आहे. या परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप असलेल्या पाच विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. या यशवंतांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणातील प्रत्येकी ५, राजस्थानातील ४, उत्तर प्रदेशमधील २, हरयाणा, आसाम, बिहार, पंजाब, केरळ, कर्नाटक, झारखंड या राज्यातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
अंबाडीच्या भाजीवर संशोधन करणारा अमरावतीचा श्रेणिक राज्यात अव्वल
जेईई मेन्समध्ये अमरावती येथील श्रेणिक मोहन साकला २९५ गुण मिळवत राज्यातून अव्वल तर देशात ११ व्या स्थानी झळकला आहे. आयआयटी, पवई येथून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याचा मानस त्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला. विदर्भाच्या मातीत अलगदपणे उगवणारी अंबाडीची भाजी ही कशी गुणकारी आहे, हे श्रेणिकने संंशोधन प्रकल्पातून सिद्ध केले आहे. याच प्रकल्पाला डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्राने सुवर्ण पदकाने गौरविले होते.
देश-विदेशातील ६२२ केंद्रांवर परीक्षा
जेईई-मेन परीक्षा ४४० शहरांतील ६२२ परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये विदेशातील मनामा, दोहा, मस्कत, शारजाह, रियाध, काठमांडू, दुबई, सिंगापूर, कुवेत, कौलालंपूर, लागोस/अबुज, कोलंबो, जकार्ता, व्हिएन्ना, मॉस्को, पोर्ट लुईस, बँकॉक या ठिकाणांचा समावेश होता. त्यातील व्हिएन्ना, मॉस्को, पोर्ट लुईस, बँकॉक येथे पहिल्यांदाच जेईई-मेन परीक्षा घेण्यात आली.