24 वर्षांत एचएएलने केवळ 10 तेजस विमानेच दिली : हवाईदल प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 07:38 PM2019-02-01T19:38:29+5:302019-02-01T19:50:05+5:30
सप्टेंबर 2016 च्या करारानुसार हवाईदलाला 36 राफेल विमाने तयार मिळणार आहेत.
नवी दिल्ली : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 1995 मध्ये 20 हलकी तेजस विमाने बनविण्यास दिली होती. मात्र, एचएएल गेल्या 24 वर्षांत केवळ 10 विमानेच देण्यात यशस्वी झाली आहे. हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये ही माहिती दिली. त्यांना राफेल विमानांचे एचएएलला कंत्राट न दिल्यावरून प्रश्न विचारण्यात आला होता.
भारत सरकारने 126 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी जानेवारी 2012 मध्ये फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनला निवडण्यात आले होते. यानुसार काही विमाने तयार मिळणार होती, तर काही विमाने दसॉल्ट आणि एचएएल मिळून भारतात तयार करणार होती. मात्र, त्यांच्यामध्ये समझोता करार न होऊ शकल्याने हा व्यवहार पुढे जाऊ शकला नाही. एचएएलला राफेल विमाने बनविण्यासाठी दसॉल्टपेक्षा तिप्पट वेळ हवा होता.
सप्टेंबर 2016 च्या करारानुसार हवाईदलाला 36 राफेल विमाने तयार मिळणार आहेत. आतापर्यंत 25 टक्के रक्कम फ्रान्स सरकारला देण्यात आली आहे. यानुसार सप्टेंबर 2019 मध्ये पहिले राफेल विमान भारतात दाखल होईल, अशी अपेक्षा सरकारला आहे.