पहिल्या घराच्या कर्जावर २.४0 लाखांची सवलत
By admin | Published: February 11, 2017 05:11 AM2017-02-11T05:11:23+5:302017-02-11T05:11:23+5:30
तुमचे वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही पहिलेच घर खरेदी करणार असाल, तर तुम्हाला २ लाख ४0 हजार रुपयांचा फायदा होईल
नवी दिल्ली : तुमचे वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही पहिलेच घर खरेदी करणार असाल, तर तुम्हाला २ लाख ४0 हजार रुपयांचा फायदा होईल. सरकारने अशा गृहकर्जावर सबसिडी देण्याचे ठरविले आहे. सध्या ६ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांनाच ही सबसिडी दिली जाते.
बांधकाम आणि घरखरेदी यांना वेग देण्यासाठी तसेच २0२२ सालपर्यंत सर्वांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आता सबसिडीचे दोन स्लॅब केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर रोजी जी घरखरेदी योजना जाहीर केली, त्याचे तपशील आता स्पष्ट झाले असून, उत्पन्नाच्या आधारे सबसिडी देण्याचा उल्लेख त्यात आहे.
वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असेल, तर सहा लाखांपर्यंतच्या कर्जावर ६.५ टक्के सबसिडी दिली जाईल. कर्जाची रक्कम कितीही असली तरी सहा लाखांपर्यंतच्या कर्जावरच ही सवलत असेल. गृहकर्जाचे व्याज ९ टक्के असेल पहिल्या सहा लाखांवर २.५ टक्केच व्याज आकारले जाईल. उरलेल्या रकमेवर मात्र कर्ज घेणाऱ्यांना ९ टक्क्यानेच व्याज द्यावे लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये असणाऱ्यांना नऊ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर ४ टक्के सबसिडी सरकार देईल, तर १८ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १२ लाख रुपयांच्या कर्जावर ३ टक्के सबसिडी म्हणजे सवलत मिळेल.
तिन्ही विभागांमध्ये मिळणाऱ्या सबसिडीमुळे २0 वर्षे मुदतीच्या कर्जावर किमान २ लाख ४0 हजार रुपये इतका फायदा होईल. तसेच कर्ज परत करण्याच्या हप्त्यात २२00 रुपयांचा फरक पडेल.
खरेदीदारांना दिलासा देणार
ही योजना तीन वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी आणि केवळ पहिलेच घर खरेदी करणाऱ्यांसाठी आहे. त्यात सर्वच उत्पन्न गटातील घर खरेदीदारांना व्याजाच्या रकमेत दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान आवास योजनेनुसार के वळ १५ वर्षे मुदतीची गृहकर्जांची मुदत २0 वर्षे करण्यात आली आहे.