ब्रसेल्समधून २४२ भारतीय परतले
By admin | Published: March 26, 2016 01:01 AM2016-03-26T01:01:44+5:302016-03-26T01:01:44+5:30
बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे विमानतळ आणि मेट्रो स्थानकावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अडकून पडलेले २४२ भारतीय शुक्रवारी जेट एअरवेजच्या विमानाने
नवी दिल्ली : बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे विमानतळ आणि मेट्रो स्थानकावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अडकून पडलेले २४२ भारतीय शुक्रवारी जेट एअरवेजच्या विमानाने मायदेशी परतले आहेत. अॅमस्टरडॅमहून ९ डब्ल्यू १२२९ हे विमान येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यात २८ विमान कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
यातील ६९ प्रवाशांना मुंबईला पाठविले जाणार होते; मात्र तांत्रिक अडचणीमुळे अखेरच्या क्षणी त्यांचे विमान रद्द करण्यात आले. तत्पूर्वी ब्रसेल्समध्ये अडकून पडलेल्या भारतीय प्रवाशांना रस्तामार्गे ब्रसेल्सहून अॅमस्टरडॅमला पाठविण्यात आले होते. भारतीय प्रवाशांचे विमान पहाटे ५.१० वाजता दिल्लीला उतरल्याची माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने दिली आहे. ब्रसेल्स येथील हल्ल्यात ३१ जण ठार तर ३०० जण जखमी झाले आहेत.
‘जेट’ची दोन खास विमाने...
जेट एअरवेजने गुरुवारी अॅमस्टरडॅम आणि टोरोंटोसाठी दोन खास विमानांची व्यवस्था केली होती. ब्रसेल्स विमानतळावर अडकलेली सर्व चार विमाने बाहेर काढल्यानंतर या विमान कंपनीने प्रारंभी तीन विमानांची व्यवस्था केली होती. त्यात मुंबईसाठीच्या विमानाचाही समावेश होता, मात्र तिसरे विमान रद्द करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
स्फोट होताच प्रवाशांची उडाली धावपळ
- टोरोंटोहून आमचे विमान ब्रसेल्स येथे उतरताच स्फोट झाला, असे एका महिलेने ब्रसेल्स येथील विमानतळावर झालेल्या तीन स्फोटानंतरची आपबिती सांगताना नमूद केले.
या महिलेने सांगितले की विमानतळाच्या बहिर्गमन भागात (डिपार्चर) स्फोट झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी बॅगा हाती घेत एकच धावपळ केली.
स्फोट झाल्यानंतर लगेच आम्ही ब्रसेल्स विमानतळावर उतरल्यामुळे आम्हाला विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये प्रवेश मिळाला नाही, आम्हाला अन्यत्र नेण्यात आले. आमच्या सर्वांची चांगल्याप्रकारे काळजी घेण्यात आली, अशी माहिती एका अन्य प्रवाशाने दिली.