२४७२ महिलांचा सर्वात मोठ्ठ्या ब्लँकेटचा गिनीज वर्ल्ड बूक रेकॉर्ड
By admin | Published: February 2, 2016 04:25 PM2016-02-02T16:25:46+5:302016-02-02T16:46:37+5:30
भारतासह जगातील सात प्रमुख देशांतील तब्बल २४७२ महिला फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र आल्या आणि पाच महिन्यांच्या मेहनतीतून ११,१४८ चौरस मीटरचे ‘ब्लँकेट’ साकारले.
Next
>जयंत धुळप
अलिबाग, दि. २ - भारतासह सात देशांतील २ हजार हून अधिक महिलांनी एकत्र येऊन तब्बल ११ हजार चौ.मिटरचे ब्लँकेट विणून 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नवा विक्रम नोंदवला.
कोणत्याही महिला एकत्र येण्यासाठी गावे, राज्यं, देश यांच्या मर्यादा नसतात. भारतासह जगातील सात प्रमुख देशांतील तब्बल २४७२ महिला केवळ फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक सद्हेतू साठी एकत्र आल्या आणि त्याच्या पाच महिन्यांच्या अथक मेहनतीतून लोकर, यार्न आणि धागे यांच्या गुंफलेल्या बंधांतून तब्बल ११,१४८ चौरस मीटरचे ‘क्रोचेट ब्लँकेट’ रविवारी साकारले. चेन्नईतील एमएनएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणावर साकारलेल्या हे ब्लँकेट पाहून हजारो उपस्थितांसह ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे निरिक्षक देखील थक्क झाले आणि आम्ही भगिनी नवा जागतिक विक्रम आम्ही करु शकलो अशी माहिती या विक्रमी क्रोचेट ब्लॅन्केट निर्मिती प्रक्रीयेत सहभागी झालेल्या अलिबागच्या नंदिनी वाणी व त्यांच्या दोन कन्या अबोली व तन्मयी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अनाथालयातील मुलांना मिळणार ब्लॅन्केटची ऊब
चेन्नईमधील एमबीए महिला सुभश्री नटराजन यांनी फेसबुक आणि व्हॅट्सअॅपच्या माध्यमातून केलेल्या ‘क्रोचेट ब्लँन्केट’ निर्मिती उपक्रमास भारतासह विविध देशातून महिलांचा अनन्यसाधारण प्रतिसाद लाभला. यामध्ये भारतातील महाराष्ट्रातील १९९ महिलांसह केरळ, तामिळनाडू राज्यांतील महिला तसेच अमेरिका, कुवेत, ऑस्ट्रेलियासह सात देशातील २४७२ महिला सहभागी झाल्या. केवळ जागतीक विक्रमाकरीता ब्लॅन्केट निर्मिती नव्हे तर या सामूहीक प्रयत्नातून निर्माण होणा:या ब्लॅन्केट्सचे देशातील अनाथालयातील मुले व गरजूंचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी, सामाजिक बांधिलकी म्हणून वाटप करण्याचा प्रमुख हेतू यामागे होता, असे नंदिनी वाणी म्हणाल्या.
ब्लँकेट विणताना जागतिक स्तरावरील महिलांच्या संघटीत प्रयत्नांची जुळली वीण
सुभश्री नटराजन यांनी हा उपक्रम ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदणीकृत केल्यावर साऊथ आफ्रिकेत यापूर्वी ३३७७ चौरस मीटरच्या ‘क्रोचेट ब्लँकेट’चा ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवला असल्याने 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडून ५ हजार चौरस मीटरच्या ‘क्रोचेट ब्लँकेट’चे लक्ष आम्हाला देण्यात आले होते. नटराजन मॅडमच्या नेतृत्वाखाली, साऊथ आफ्रिकेतील 'ब्लँकेट’चा रेकॉर्ड मोडून जागतिक स्तरावर तब्बल ११,१४८ चौरस मिटरच्या ‘क्रोचेट ब्लँकेट’चा विक्रम नोंदवल्याबद्दल खूप आनंद वाटत असल्याचे वाणी यांनी सांगितले. ही मोठी ब्लँकेट विणता-विणता जागतिक स्तरावरील महिलांच्या संघटीत प्रयत्नांची अनोखी वीण जुळल्याचे या उपक्रमाच्या निमीत्ताने जगासमोर आले आहे.