कोरोनायोद्धा डॉक्टरांना विमान प्रवासात २५ टक्के सवलत; इंडिगो विमान कंपनीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:09 AM2020-07-03T01:09:13+5:302020-07-03T01:09:31+5:30
विमान प्रवासात ओळखपत्र दाखविणे बंधनकारक
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या डॉक्टर व नर्सचा गौरव करण्यासाठी येत्या डिसेंबरच्या अखेरपर्यंत या कोरोनायोद्ध्यांना विमान प्रवासात २५ टक्के सवलत देण्याचे इंडिगो विमान कंपनीने गुरुवारी जाहीर केले.
इंडिगोच्या अधिकृत वेबसाइटवरून १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२० या काळातील प्रवासासाठी काढलेल्या तिकिटावर डॉक्टर व नर्सना ही सवलत दिली जाईल. असे सवलतीचे तिकीट काढणाऱ्यांना प्रवासाच्या वेळी ‘चेक इन’ करताना त्यांच्या इस्पितळाचे ओळखपत्र दाखवावे लागेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले.
कंपनी म्हणते प्रवासभाड्यातील या सवलतीखेरीज संपूर्ण प्रवासात या कोरोनायोद्ध्यांचा यथोचित जाहीर सन्मानही करण्यात येईल. कंपनीने या सवलत योजनेस ‘टफ कूकी स्कीम’ म्हटले आहे. त्यानुसार ‘चेक-इन’ करताना डॉक्टर व नर्सना चॉकलेटचा एक बॉक्स भेट म्हणून दिला जाईल, बोर्डिंग गेटवर त्यांच्या स्वागताची विशेष उद््घोषणा केली जाईल, विमानात प्रवेश करताना त्यांचे विशेष स्वागत केले जाईल व आसनावर बसताना त्यांना जे ‘पीपीई किट’ दिले जाईल त्यावरही ‘टफ कूकी’ असा स्टीकर लावलेला असेल.
अजूनही विमाने निम्मी रिकामी
दोन महिने बंद असलेल्या देशांतर्गत प्रवासी विमानसेवा २५ मेपासून काही प्रमाणात पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्या तरी बहुतांश विमाने अजूनही निम्मी रिकामीच जात आहेत. नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी केलेल्या टष्ट्वीटवरूनही हेच स्पष्ट झाले. १ जुलैपर्यंत चाललेल्या ७८५ विमानसेवांमधून एकूण ७१,४७१ प्रवाशांनी प्रवास केला, असे पुरी यांनी म्हटले. म्हणजे प्रत्येक विमानाने सरासरी ९१ प्रवाशांनी प्रवास केला. देशांतर्गत प्रवासासाठी वापरली जाणारी बहुतांश विमाने एअरबस अे-३२० असतात व अशा प्रत्येक विमानाची आसनक्षमता १८० असते. प्रत्येक विमानातील सरासरी ९१ प्रवासी म्हणजे निम्मी विमाने रिकामी गेल्याचे दिसते.