सरकार पाडण्यासाठी आमदारांना २५ कोटी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:10 AM2024-02-05T09:10:53+5:302024-02-05T09:11:24+5:30
आरोपांमुळे पोलिसांची आतिशी यांना नोटीस
लोकतम न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपकडून ‘आप’च्या आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याच्या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज ‘आप’च्या नेत्या आणि दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांना नोटीस बजावली. गुन्हे शाखेचे पथक रविवारी दुपारी १२:५५ वाजता दुसऱ्यांदा आतिशी यांच्या निवासस्थानी पोहोचले व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे नोटीस सुपूर्द केली. याच्या एक दिवस आधी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली होती. गुन्हे शाखेने नोटिसीद्वारे केजरीवाल आणि आतिशी यांना त्यांनी भाजपवर केलेल्या आरोपांबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.
आतिशी यांना ५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. नोटिसीवर प्रतिक्रिया देताना, ‘आप’च्या नेत्या जस्मिन शाह म्हणाल्या की, नोटिसीमध्ये कोणतेही समन्स किंवा एफआयआर किंवा भारतीय दंड संहिता किंवा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्याही कलमाचा उल्लेख नाही. ते केवळ पांढऱ्या कागदावर लिहिलेले पत्र आहे.
काय होता दावा?
n‘भाजप आप सरकार पाडण्यासाठी आपच्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपये आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. ’असा दावा केजरीवाल व आतिशी यांनी २७ जानेवारी रोजी केला होता;
nभाजपने हे आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते.