देशात अडीच लाख नवे रुग्ण; कोरोना रुग्णांची २३६ दिवसांतील सर्वोच्च संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 09:52 AM2022-01-14T09:52:45+5:302022-01-14T09:52:55+5:30
५४८८ ओमायक्रॉनबाधित
नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे २ लाख ४७ हजार नवे रुग्ण आढळून आले असून, हे मागील २३६ दिवसांतले सर्वाधिक प्रमाण आहे. ओेमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ५,४८८ झाली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या आणखी वाढून ११ लाख १७ हजारांवर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे २ लाख ४७ हजार ४१७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे या बाधितांचा एकूण आकडा ३ कोटी ६३ लाख १७ हजार ९२७ झाला आहे. त्यातील ३ कोटी ४७ लाख १५ हजार ३६१ जण बरे झाले. गेल्या चोवीस तासांत ३८० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मरण पावलेल्यांचा आकडा ४ लाख ८५ हजार ३५ इतका झाला आहे. देशात ११ लाख १७ हजार ५३१ सक्रिय रुग्ण आहेत. मागील २१६ दिवसांतील हे सर्वाधिक प्रमाण आहे.
ओमायक्रॉनचे एका दिवसात आणखी ६२० बाधित आढळले. या विषाणूच्या ५४८८ रुग्णांपैकी २१६२ जण बरे झाले. ओमायक्रॉनबाधितांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असून त्यानंतर राजस्थान, दिल्ली, केरळ, कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. कोरोनाच्या एकूण बाधितांपैकी सक्रिय रुग्णांची आकडेवारी ३.०८ टक्के आहे.
गेल्या चोवीस तासांत सक्रिय रुग्णांच्या आकड्यात १ लाख ६२ हजार २१२ जणांची वाढ झाली होती. कोरोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण ९५.५९ टक्के आहे. दर आठवड्याचा व दररोजचा संसर्गदर अनुक्रमे १३.११ टक्के व १०.८० टक्के तसेच मृत्युदर १.३४ टक्के आहे. देशातील नागरिकांना कोरोना लसीचे आतापर्यंत १५४.६१ कोटी डोस देण्यात आले.
ॲस्ट्राझेनेकाची लस बूस्टर डोस म्हणून प्रभावी
ओमायक्रॉनविरोधात ॲस्ट्राझेनेकाची व्हॅक्झेवेरिया ही लस तिसरा डोस किंवा बूस्टर डोस म्हणून प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगांतून आढळून आले आहे. ही लस घेतल्यानंतर ओमायक्राॅनविरोधात प्रतिकारशक्ती वाढल्याचे दिसून आले.
दिल्लीत २८ हजार नवे रुग्ण
दिल्लीत गुरुवारी २८ हजार ८६७ काेराेनाबाधित आढळले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला. बुधवारपेक्षा काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली तरी, काेविड रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. बुधवारी दिल्लीत २७ हजार काेराेनाबाधित आढळले, तर ४० जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी काेराेनाबाधितांच्या संख्येत थाेडी वाढ झाली, तर मृत्यूदर घटला आहे. गुरुवारचा संक्रमण दर २९.२१ टक्के होता. काेविडसाठी राखीव असलेल्या रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.