कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळात २५ नव्या मंत्र्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:20 AM2018-06-07T02:20:31+5:302018-06-07T02:20:31+5:30
दोन आठवड्यांपूर्वी एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे १४, सत्ताधारी जनता दलाचे (एस) नऊ आणि बहुजन समाज पक्ष व केपीजेपी यांच्या प्रत्येकी एक अशा २५ जणांना सामावून घेण्यात आले.
बंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळाचा बुधवारी २५ मंत्र्यांचा समावेश करून विस्तार करण्यात आला. दोन आठवड्यांपूर्वी एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे १४, सत्ताधारी जनता दलाचे (एस) नऊ आणि बहुजन समाज पक्ष व केपीजेपी यांच्या प्रत्येकी एक अशा २५ जणांना सामावून घेण्यात आले.
राज्यपाल वजुभाई वाला यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जनता दलाचे (एस) प्रमुख एच. डी. देवेगौडा यांचे चिरंजीव एच. डी. रेवण्णा व राज्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांचा शपथ घेतलेल्यांत समावेश आहे.
काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले जनता दलाचे (एस) जी. टी. देवे गौडा यांचाही मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मंत्रिमंडळात काँग्रेसच्या जयमाला या एकमेव महिला आहेत. सत्तावाटप सूत्रानुसार काँग्रेसचे २२ तर जनता दलाचे १२ मंत्री असतील. सध्या मंत्रिमंडळात एकूण २७ मंत्री सामील झाले आहेत व अजून सात जागा रिक्त आहेत.
जयनगरमध्ये जनता दल नाही
जयनगरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत जनता दल आपला उमेदवार उभा करणार नाही. भाजपाचे उमेदवार विजयकुमार यांचे निवडणुकीआधी निधन झाल्याने मतदान पुढे ढकलावे लागले होते. जनता दलाने उमेदवार काले गौडा याला माघार घेण्यास सांगत काँग्रेस उमेदवारास पाठिंबा दिला आहे.