देशातील २५% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, घड्याळातील वेळही सांगता येत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:33 AM2018-01-17T02:33:58+5:302018-01-17T02:36:40+5:30
आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या व १४ ते १८ वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो; पण दहापैकी एक चतुर्थांश मुलांना मातृभाषेतील मजकूर मात्र नीट वाचता येत नाही
नवी दिल्ली : आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या व १४ ते १८ वर्षे वयोगटातील दर दहा मुलांपैकी सात जणांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो; पण दहापैकी एक चतुर्थांश मुलांना मातृभाषेतील मजकूर मात्र नीट वाचता येत नाही, असा निष्कर्ष अॅन्युअल स्टेटस आॅफ एज्युकेशन रिपोर्ट (असर)च्या अहवालातून समोर आला आहे.
देशाच्या २४ राज्यांतील २४ जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल तयार करण्यात आला. सर्वेक्षणासाठी सुमारे दोन हजार स्वयंसेवकांनी ३५ संस्थांच्या मदतीने १,६४१ गावांतील २५ हजार घरांना भेटी दिल्या आणि ३० हजार मुला-मुलींशी संपर्क साधून त्यांची शैक्षणिक स्थिती जाणून घेतली. ही मुले काय करतात, त्यांची क्षमता, जागरूकता, त्यांचे ध्येय अशा चार मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून हे सर्वेक्षण करण्यात आले. हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा कसा बोजवारा उडालेला आहे, हे त्यातील निष्कर्षांनी दाखवून दिले आहे.
वयाच्या १४ व्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजमध्ये पटनोंदणी न झालेल्या मुलांची संख्या ५ टक्के आहे, तर १८ वर्षांच्या मुलांचे याबाबतीत प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ हा अमलात आल्यानंतर लगेचच जी मुले आठवी इयत्ता उत्तीर्ण झाली, अशा १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक स्थितीबाबत हा अहवाल भाष्य करतो. ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, असे शिक्षण हक्क कायद्यामध्ये म्हटले आहे.
असरच्या अहवालात म्हटले आहे की, १४ ते १८ वर्षे वयोगटातील २५ टक्के मुले आपल्या मातृभाषेतील मजकूर धडपणे वाचू शकत नाहीत; पण १४ वर्षे वयोगटातील ५३ टक्के मुले इंग्रजी वाक्ये वाचू शकतात. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांपैकी ५९ टक्के मुलांनी कॉम्प्युटर कधीच हाताळलेला नाही.
वयाच्या १४ व्या वर्षी शाळेत मुला-मुलींची जी पटनोंदणी होते, त्या टक्केवारीत ही मुले जेव्हा १८ वर्षांची होतात, त्यावेळी बराच फरक पडलेला असतो. १८ वर्षे वयोगटातील ३२ टक्के मुलींची शाळा किंवा कॉलेजमध्ये पटनोंदणी होत नाही, तर हेच प्रमाण मुलांमध्ये २८ टक्के आहे.
या मुलांपैकी ५ टक्के मुलेच फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. औपचारिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांपैकी ४२ टक्के मुले ही कमावती असतात. कमावत्या मुलांपैकी ७९ टक्के मुले कुटुंबातील शेतीत राबतात, तर ७७ टक्के मुले व ८९ टक्के मुली घरगुती कामांमध्ये गुंतलेली असतात.
१४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना वित्तसंस्था, प्रसारमाध्यमे, डिजिटल वर्ल्ड याविषयी किती माहिती असते याची पडताळणी केली असता त्यातील ७३ टक्के मुलांनी मोबाईल फोनचा व्यवस्थित वापर केल्याचेही आढळून आले. मात्र, १२ टक्के मुलांनी मोबाईल आजवर कधीच वापरलेला नसून, मुलींमध्ये हे प्रमाण २३ टक्के इतके आहे.
१४ ते १६ वर्षे वयोगटातील भागाकार करता येत नाही. या विद्यार्थ्यांना देशाचा नकाशा दाखविला, तर कोणत्या देशाचा हे १४ टक्के विद्यार्थ्यांना ओळखता आले नाही. त्यातील ३६ टक्के विद्यार्थ्यांना देशाच्या राजधानीचे नाव माहीत नव्हते. इतकेच नव्हे तर ते कोणत्या राज्यात राहतात, त्याचे नावही ठाऊक नव्हते.
या विद्यार्थ्यांपैकी एक चतुर्थांश विद्यार्थ्यांना पैसे मोजणे नीट जमत नव्हते. ४० टक्के मुलांना घड्याळ बघून नेमके किती वाजलेत ते सांगता आले नाही. ४४ टक्के मुलांनी वजनाच्या मोजणीतही चुका केल्या.