डेंग्यूप्रकरणी आरोग्यमंत्र्यांना २५ हजारांचा दंड
By admin | Published: October 4, 2016 03:45 AM2016-10-04T03:45:13+5:302016-10-04T03:45:13+5:30
राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या विरोधातील मोहिमेत सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या विरोधातील मोहिमेत सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा करण्यासाठी शपथपत्र दाखल करण्यात अपयशी ठरलेल्या आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना, सर्वोच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
न्यायालयाने जैन यांना सांगितले होते की, चिकुनगुनियाच्या मोहिमेत सहकार्य न केल्याबाबत ज्या अधिकाऱ्यांवर आरोप लावण्यात आलेला आहेत, त्यांच्या नावांचा खुलासा करा.
न्या. मदन बी. लोकुर आणि न्या. धनंजय वाई चंद्रचूड यांच्या खंडपीठाने जैन यांना आता मंगळवारपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे, तर अधिकाऱ्यांवरील आरोप अतिशय गंभीर आहेत, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले.
तथापि, जैन यांच्या वतीने अॅड. चिराग उदय सिंह यांनी सांगितले की, जैन हे मंगळवारी शपथपत्र दाखल करतील. आम्हाला २४ तास द्या, अशी विनंती या वकिलांनी केली, तेव्हा न्यायालयाने त्यांना फटकारले की, लोक मरत आहेत आणि आपल्याला आणखी २४ तासांची गरजच पडायला नको.
जैन यांनी असा आरोप केला होता की, राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखे डासांमुळे पसरणारे आजार वाढत आहेत, पण अधिकारी सहकार्य करीत नाहीत आणि जबाबदारी घेत नाहीत.
एका जनहित याचिकेवर न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस जारी केली होती. जैन यांनी या नोटिसीला उत्तर देतानाही स्पष्ट केले होते की, आजाराला रोखण्यासाठी अधिकारी सहकार्य करीत नाहीत, तर जैन यांनी असेही स्पष्ट केले होते की, या आजारांशी संंबंधित फाइल मंजुरीसाठी नायब राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येत आहे.