२५ हजारांची बचत; पण नोटा निघाल्या बाद झालेल्या, संभाव्य उपासमारी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 05:52 AM2020-07-14T05:52:52+5:302020-07-14T06:45:22+5:30
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पोथियामुपानूर या गावातील सोमू आणि पलानीअम्मल या दाम्पत्याच्या डोळ्यात या अविश्वसनीय घटनेनंतर आनंदाश्रू तरळले.
इरोड (तामिळनाडू) : या जिल्ह्यातील एका वृद्ध, अपंग दाम्पत्यास गेल्या शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या रूपाने जणू देवच भेटला व कोरोना ‘लॉकडाऊन’मुळे त्यांच्यावर आलेली संभाव्य उपासमारीची वेळ टळली.
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पोथियामुपानूर या गावातील सोमू आणि पलानीअम्मल या दाम्पत्याच्या डोळ्यात या अविश्वसनीय घटनेनंतर आनंदाश्रू तरळले. सोमू अंध आहेत, तर पलानीअम्मल पायाने अपंग आहेत. दोघेही गावातील मंदिरांच्या बाहेर अगरबत्ती, कापूर असे पूजासाहित्य विकून उपजीविका करतात. मार्चपासून सुरू झालेल्या ‘लॉकडाऊन’ने मंदिरांसोबतच त्यांचे चरितार्थाचे एकमेव साधनही बंद झाले. तरीही त्यांनी घरातील उरल्यासुरल्या पैशा-अडक्यावर कसेतरी तीन महिने काढले.
सोमू व पलानीअम्मा यांनी म्हातारपणी हातपाय पार थकतील तेव्हा कोणाहीपुढे लाचारीने हात पसरावे लागू नयेत यासाठी घरात जपून ठेवलेल्या ‘पुंजी’ला हात घालायचे ठरविले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी त्यांची एकमेव गाय विकली होती. त्यातून मिळालेले २५ हजार रुपये त्यांनी फुटक्या ट्रंकेच्या तळाशी जपून ठेवले होते. अगदीच नाईलाज झाल्याने पोट भरण्यासाठी त्यांनी हे पैसे चरितार्थासाठी वापरायचे ठरविले.
पण दुर्दैव असे की, दरम्यानच्या काळात मोदी सरकारने नोटाबंदी केल्याने या दाम्पत्याची ती बहुमोल पुंजी कवडीमोल झाली होती!
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च्या पगारातून २५ हजार रुपयांची केली मदत
500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ती सर्व रक्कम होती व त्या नोटा रद्द झाल्या होत्या. गावात कोणी हे पैसे घेईनात तेव्हा ते बँकेत गेले. बँकेतील अधिका-यांनी त्यांना नोटा का घेणार नाही किंवा बदलूनही मिळणार नाहीत, हे समजावून सांगितले. तरीही त्यांनी सरकारच्या एखाद्या योजनेतून मदत मिळते का, हे पाहावे असे सुचविले.
- सोमू व पलानीअम्मा निरक्षर आहेतच. शिवाय या धक्क्याने ते एवढे निराश झाले की, त्यांनी सरकारी मदतीसाठी कोणताही अर्ज केला नाही. तरीही त्यांची ही करुण कहाणी पत्रकारांच्या माध्यमातून इरोडचे तरुण जिल्हाधिकारी सी. कथिरवन यांच्या कानावर गेली.
- आश्चर्य असे की, कथिरवन यांनी कोणत्याही सरकारी योजनेची वाट न पाहता आपल्या स्वत:च्या पगारातील २५ हजार रुपये खास दूताकरवी सोमू व पलानीअम्मा यांच्या हाती सुपूर्द केले! सनदी अधिकाºयाच्या खुर्चीत बसलेल्या या देवमाणसाचे जिल्ह्यात सर्वत कौतुक होत आहे.