कोरोनात वडील गमावले, कुटुंबाची घेतली जबाबदारी; 25 व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:52 PM2023-12-28T14:52:48+5:302023-12-28T16:05:42+5:30
कोरोनाच्या लाटेत सलोनी अग्रवालने तिचे वडील गमावले. जेव्हा तिच्यावर जबाबदाऱ्या पडल्या तेव्हा तिने आपल्या आईची आणि लहान भावाची खूप काळजी घेतली.
25 वर्षीय सलोनी अग्रवालची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. कोरोनाच्या लाटेत सलोनी अग्रवालने तिचे वडील गमावले. जेव्हा तिच्यावर जबाबदाऱ्या पडल्या तेव्हा तिने आपल्या आईची आणि लहान भावाची खूप काळजी घेतली. त्याच वेळी, तिने स्वतःला देखील सांभाळलं, खचून गेली नाही.
सलोनी अग्रवाल हिने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (MPPSC) परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. सलोनीने पीटीआयला सांगितलं की, जेव्हा मी राज्य सेवा परीक्षेची तयारी करत होते. त्याच काळात माझ्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेने माझं संपूर्ण कुटुंब खचलं. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा कोरोनाचा कहर शिगेला पोहोचला होता, तेव्हा घरी राहून तयारी करणे माझ्यासाठी कठीण झालं होतं. सर्वत्र नकारात्मक बातम्या येत होत्या.
सलोनी म्हणाली की, त्यावेळी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. परत फिरण्याचा मार्ग नव्हता. म्हणून मी माझी तयारी चालू ठेवली. आज माझे वर्षानुवर्षे जुने स्वप्न पूर्ण झाले आहे. आज मला माझ्या वडिलांची उणीव जाणवत आहे. खरगोनची रहिवासी असलेल्या सलोनीने बीबीए पूर्ण केल्यानंतर 2018 मध्येच स्टेस सर्व्हिस परीक्षेची तयारी सुरू केली. डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर माझं ध्येय महिलांचं शिक्षण आणि त्यांच्या विकासावर असेल.
जेव्हा तुम्ही स्त्रीला शिक्षित करता तेव्हा ती स्वतःला सक्षम बनवते. MPPSC द्वारे आयोजित राज्य सेवा परीक्षा 2019 च्या पहिल्या 10 यशस्वी उमेदवारांमध्ये सात महिलांचा समावेश आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. एमपीपीएससीने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केलेल्या निकालानुसार, प्रिया पाठक या परीक्षेत अव्वल आली आणि तिची डेप्युटी कलेक्टर पदासाठी निवड झाली.