25 साल बाद! टाटा मोटर्समध्ये काम करणारा, 'IPS बनून रतन टाटांना भेटतो तेव्हा'...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 09:46 PM2019-07-17T21:46:52+5:302019-07-17T22:22:04+5:30
महेश मुरलीधर भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे आहेत. शिक्षक वडिलांच्या या मुलाने सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते.
हैदराबाद - तेलंगणामधील मराठमोळे आयपीएस अधिकारी आणि तेलंगणातील रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत टाटा उद्योग समुहाचे प्रमुख रतन टाटा यांच्याशी हस्तांदोलन करताना ते दिसत आहे. मात्र, या फोटोसह लिहिण्यात आलेले कॅप्शन अनेकांसाठी प्रेरणादायी आणि मराठी माणसांसाठी अभिमानास्पद आहे. तसेच रतन टाटा यांना भेटून अत्यानंद झाल्याचे महेश भागवत यांनी म्हटले आहे. तब्बल 25 वर्षांनंतर ही महेश भागवत हे हमने टाटा का नमक खाया है... असे भावनिक होऊन म्हणतात.
महेश मुरलीधर भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे आहेत. शिक्षक वडिलांच्या या मुलाने सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते. याच काळात म्हणजे 1993-94 मध्ये महेश भागवत हे पुण्यातील टाटा मोटार्स या कंपनीत कामाला होते. कधीकाळी टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या या तरुणाला, आपण भविष्यात टाटा मोटार्सचे मालक रतन टाटा यांना भेटू, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर महेश भागवत यांनी आयपीएस परीक्षा पास केली. त्यानंतर, गेल्या अनेक वर्षांपासून ते आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे तेलंगणा राज्य निर्मित्ती झाल्यानंतर त्यांना तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते आयपीएस म्हणून तेलंगणातच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे महिला आणि बाल तस्करीविरुद्ध महेश भागवत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महेश भागवत हे गेल्या 13 वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या तेरा वर्षांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणात त्यांनी व त्यांच्या पथकासोबत शेकडो बालमजुरांची सुटका केली. शिवाय तेथील देहविक्री व्यवसायदेखील बंद केलेत.
महेश भागवत यांच्या या कामगिरीबद्दल अमेरिकेनेही त्यांचा बहुसन्मान केला आहे. अमेरिकेने ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अवार्ड’ देऊन महेश मुरलीधर यांचा गौरव केला आहे. महेश भागवत आता हैदराबादमधील रचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे ते अस्सखलीत तेलुगू भाषेत बोलतात. तेलुगू भाषा शिकून त्यांनी तेथील नक्षली आणि आदिवासी भागात मोठं काम केलं आहे. अदिबाटला येथील टाटा एअरोस्पेस बोईंग प्लान्टच्या उद्घाटनावेळी महेश भागवत हे आपल्या कर्तव्यावर होते. त्यावेळी, माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री केटीआर यांनी महेश भागवत यांचा रतन टाटांशी परिचय करुन दिला. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. तसेच, टाटा का नमक खाया है... असेही त्यांनी आपल्या लिंकड-इनच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात महेश भागवत यांनी जुनी आठवण म्हणून हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोवर अतिशय चांगल्या कमेंट मिळाल्या आहेत. त्यापैकी एका कमेंटमध्ये दोन्ही महान व्यक्तींच्या हातमिळवणीतील नम्रता सर्वकाही सांगून जाते, असे म्हटले आहे.