चिनी ॲपद्वारे २५० कोटींचा गंडा, पैसे दुपटीच्या आमिषाने कृत्य; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:19 AM2021-06-10T06:19:41+5:302021-06-10T06:21:28+5:30
Chinese app : चीनच्या स्टार्टअप योजनेमधून पॉवर बँक अॅप विकसित करण्यात आले आहे. हे अॅप भारतामध्ये आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे.
देहराडून/नोएडा : कमी वेळात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष हे फसवणुकीचे कारण ठरू शकते हे माहिती असूनही अनेक लोक या आमिषाला बळी पडतात. उत्तराखंड एसटीएफने २५० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथून एका आरोपीला अटक केली. ही फसवणूक चीनमधील स्टार्टअप योजनेंतर्गत तयार झालेल्या अॅपच्या माध्यमातून केवळ चार महिन्यांमध्ये करण्यात आली आहे.
चीनच्या स्टार्टअप योजनेमधून पॉवर बँक अॅप विकसित करण्यात आले आहे. हे अॅप भारतामध्ये आतापर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. या अॅपच्या माध्यमातून लोकांना १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जात असे. त्या माध्यमातून चार महिन्यांमध्ये या ठकसेनांनी २५० कोटी रुपयांचा चुना लोकांना लावला.
फसवणूक करणारे लोकांना १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पॉवर बँक अॅप डाउनलोड करायला सांगत. हा धंदा सुमारे चार महिने सुरू होता. पोलिसांना याची माहिती नव्हती. अखेर उत्तराखंडमधील हरिद्वार येथील एका व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर या घटनेचा उलगडा झाला.
या प्रकरणी उत्तराखंड एसटीएफने नोएडा येथून पवन पांडेय याला अटक केली. त्याच्याकडून ५९२ सीमकार्ड, १९ लॅपटॉप आणि पाच मोबाइल फोन जप्त केेले. तपासात ही रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलून परदेशात पाठविली जात असल्याचे समोर आले. या प्रकरणाची माहिती आयबी आणि रॉ या संस्थांनाही देण्यात आली आहे.
वेगवेगळ्या खात्यांत पैसे
पॉवर बँक अॅप नावाच्या अॅपमध्ये १५ दिवसांत पैसे दुप्पट करण्यासाठी तक्रारदाराने दोन वेळा ९३ हजार ७२ रुपये जमा केले होते. मात्र, पैसे दुप्पट न झाल्याने पोलिसांत तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
तपासात हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता तब्ब्ल २५० कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले.