कचरा विकून केंद्र सरकारने कमावले 250 कोटी, 34.69 लाख चौरस फूट क्षेत्र साफ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 03:51 PM2022-10-21T15:51:30+5:302022-10-21T15:52:32+5:30
मोहिमे अंतर्गत देसभरात 61,532 ठिकाणांवर स्वच्छता अभियान चालवण्यात आले.
नवी दिल्ली: केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून देशात स्वच्छता अभियानाची नेहमी चर्चा होत असते. सातत्याने सरकारकडून या अभिनायाचा प्रचारही केला जातो. यातच आता केंद्र सरकारने देशभरातील कचरा विकून 250 कोटींहून अधिकचा महसूल मिळवल्याची माहिती समोर आली. जेष्ठ आयएएस व्ही.श्रीनिवास यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी (DARPG) विभागाचे सचिव श्रीनिवास यांनी सांगितले की, मोहिमेअंतर्गत सुमारे 3 लाख लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यापैकी 4500 सार्वजनिक तक्रारी कैद्यांशी संबंधित होत्या. ही मोहीम खूप मोठी आणि व्यापक आहे. जगण्याच्या सुगमतेसाठी सरकारने सुमारे 500 नियम आणि प्रक्रिया शिथिल केल्या आहेत. प्रत्येक पावलाचा भारतातील लाखो नागरिकांना फायदा झाला आहे. विशेष मोहीम 2.0 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विविध कार्यालये आणि इतर संस्थांमध्ये आयोजित केली जात आहे.
61 हजारांहून अधिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली
श्रीनिवास पुढे म्हणाले की, स्वच्छता मोहीम 61,532 ठिकाणी राबविण्यात आली आणि यातून सरकारने 252.25 कोटी रुपये कमावले. या स्वच्छता मोहिमेतून 34.69 लाख चौरस फूट क्षेत्र साफ करण्यात आले. ही मोहीम तीन आठवड्यात पूर्ण करणे ही मोठी उपलब्धी आहे. विशेष मोहीम 2.0 गेल्या तीन आठवड्यांत मोठ्या प्रमाणावर चालली आहे. यामध्ये हजारो अधिकारी व नागरिक सहभागी झाले आणि त्यांनी शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये सर्वांनी मिळून हातभार लावला आहे. त्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली.