पेट्रोल पंपच ग्राहकांना लावतात 250 कोटींचा चुना !
By admin | Published: April 30, 2017 01:53 PM2017-04-30T13:53:29+5:302017-04-30T13:53:29+5:30
पेट्रोल पंपांनाही या टॅम्परिंग"ची किडीनं अक्षरशः पोखरून काढलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - गेल्या काही दिवसांपासून देशात "टॅम्परिंग"ची कीड डोकं वर काढत असल्याचं ब-याचदा समोर आलं आहे. आता पेट्रोल पंपांनाही या टॅम्परिंग"ची किडीनं अक्षरशः पोखरून काढलं आहे. गाडीत पेट्रोल भरताना आपण पहिल्यांदा लीटरच्या आकड्यांकडे लक्ष देतो आणि त्याप्रमाणेच पैसे भरतो. मात्र मशिनच्या आत इलेक्ट्रॉनिक चिफ बसवून प्रत्येक खेपेला 10 टक्के कमी पेट्रोल देऊन वाहन चालकांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात उघड झाला आहे. पेट्रोल पंपांनी केलेल्या या पेट्रोल चोरीमुळे दरवर्षी वाहन चालकांना 250 कोटी रुपयांचा गंडा घातला जातोय.
प्रत्येक वर्षी 3.5 कोटी ग्राहक एकूण 59,595 सरकारी पेट्रोल पंपांवरून 2500 रुपयांचे पेट्रोल-डिझेल भरत असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून ही चोरी पकडली आहे. मात्र उत्तर प्रदेशातच नव्हे, तर देशभरात असे प्रकार चालत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या एसटीएफने सात पेट्रोल पंपांवर धाडी घातल्यानंतर सा सर्व प्रकार उजेडात आला आहे. या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोलचोरीसाठी मशिनच्या आत इलेक्ट्रॉनिक चिफ बसवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
ग्राहक डिस्पेन्सरमध्ये पाहून मोजमापानुसार पेट्रोलचे पैसे देतात, पण प्रत्यक्षात इथे दिसणाऱ्या आकड्यांपेक्षा गाडीत पेट्रोल 10 ते 15 टक्के कमी भरले जाते. या प्रकरणाचे तपासप्रमुख रविंदर यांनी सांगितले की, ही पेट्रोल चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. उत्तर प्रदेशच्या 1000 पेट्रोल पंपांवरच्या सर्व 1000 डिस्पेन्सिंग मशिनमध्ये इलेक्ट्रॉनिक चिफ बसवल्याचं आढळलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले असून, शनिवारी या पथकाने मुरादाबाद जिल्ह्यातल्या पाच अन्य पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यूपी एसटीएफचे या कारवाईसाठी कौतुक केले असून, दोषींवर कडक कारवाईचेही आदेश दिले आहेत.