२५० अतिरेकी काश्मीर खोऱ्यात सक्रिय
By admin | Published: October 10, 2016 11:21 PM2016-10-10T23:21:49+5:302016-10-10T23:21:49+5:30
पाकिस्तानस्थित तीन दहशतवादी संघटनांचे २५० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात सक्रिय
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तानस्थित तीन दहशतवादी संघटनांचे २५० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात सक्रिय असून, पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाला लक्ष्य करण्याचा त्यांचा डाव आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन या तीन पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे २५० दहशतवादी २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्रीच (सर्जिकल स्ट्राईकच्या आधी) घुसले आहेत.
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये (लक्ष्यनिर्धारित कारवाई) या तीन दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाले आहे. काश्मीर खोऱ्यात घुसलेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या म्होरक्यांनी काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलावर निशाणा साधण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सुरक्षा दलाला सतर्क राहून या दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सर्वप्रकारे खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षाही आणखी आवळण्यात आलेली आहे. कारण या भागातील कठीण भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी फटी आहेत. सीमेपलीकडून नव्याने होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दल खबरदारीसह सज्ज आहे, असे सूत्रांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमधील विविध छुप्या मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा बेत आहे, अशी गुप्तचर विभागाची माहिती आहे.