वाराणसीच्या मुस्लिमबहुल भागात आढळले 250 वर्षे जुने शिवमंदिर; हिंदूंनी केली पूजेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:08 IST2024-12-17T15:08:26+5:302024-12-17T15:08:58+5:30
जागा आमच्या मालकीची, पण हिंदूंनी पूजा करावी, आम्हाला हरकत नाही; मुस्लिम कुटुंबाची प्रतिक्रिया

वाराणसीच्या मुस्लिमबहुल भागात आढळले 250 वर्षे जुने शिवमंदिर; हिंदूंनी केली पूजेची मागणी
Varanasi: उत्तर प्रदेशातील संभलनंतर आता वाराणसीच्या मुस्लिमबहुल मदनपुरा भागात जुने मंदिर सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच सनातन रक्षक दलाने हे मंदिर उघडून तेथे पूजा करावी, असा अर्जही पोलिसांना केला आहे. पण, या जागेची मालकी आमच्याकडे असून, वडिलांनी 1931 मध्ये ही जागा विकत घेतल्याचा दावा मंदिराच्या शेजारील मुस्लिम व्यक्तीने केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, वाराणसीच्या दशाश्वमेध पोलीस स्टेशन हद्दीतील मदनपुरा भागात मुस्लिमांच्या घराला लागून एक मंदिर आहे. हे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर असून, सुमारे अडीचशे वर्षे जुने असल्याचा दावा केला जातोय. मात्र गेल्या अनेक दशकांपासून मंदिर बंद आहे. माहिती मिळताच, सनातन रक्षक दलाकडून मंदिर उघडण्यासाठी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. तसेच, मुस्लिमांनी मंदिरावर कब्जा केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मंदिराबाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
मंदिरात पूजा करण्याची परवानगी
मात्र, मंदिरालगतच्या मुस्लिम मालकाने कब्जा केल्याचा आरोपाचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की, 1931 मध्ये त्यांच्या वडिलांनी ही जागा खरेदी केली होती. या जागेत त्यांचे घर आणि मंदिराचा भाग त्यांच्याकडे आला. एवढंच नाही, तर आम्ही वेळोवेळी मंदिराची डागडुजी, साफसफाई, रंगरंगोटीची कामे करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, हिंदूंना या मंदिरात पूजा करायची असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, आम्हाला कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुस्लिम व्यक्तीने काय म्हटले
मंदिराच्या मालकीचा दावा करणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील मोहम्मद झाकी सांगतात की, आमच्या वडिलांनी जागा घेतली, तेव्हा मंदिर बंद होते. वडील आणि काकासह आमची चार कुटुंबे येथे राहत होती. घर आणि मंदिराची कागदपत्रे आमच्याकडे आहेत, पण कुठे ठेवलीत, हे आमचे काका सांगू शकतात. मंदिर बंद करून ताब्यात घेतल्याचा दावा करणे चुकीचे आहे. या मंदिराचेही आम्ही मालक आहोत. आमच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात हिंदू लोकसंख्या आहे आणि सर्व लोक एकत्र राहतात. बनारसमध्ये रस्ता रुंदीकरणादरम्यान अनेक मंदिरे पाडण्यात आली, पण कोणीही काही बोलले नाही. तुमची श्रद्धा असेल, तर इथे येऊन पूजा करा, आमची हरकत नाही.