२५०० भारतीय सुखरूप परतले

By admin | Published: April 27, 2015 11:18 PM2015-04-27T23:18:16+5:302015-04-27T23:18:16+5:30

२५०० वर भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सोमवारी संसदेत देण्यात आली.

2500 Indians safely return | २५०० भारतीय सुखरूप परतले

२५०० भारतीय सुखरूप परतले

Next

नवी दिल्ली: विनाशकारी भूकंपाने हादरलेल्या नेपाळमध्ये आपल्या मदत मोहिमेची व्याप्ती वाढविताना तेथे अडकलेल्या २५०० वर भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सोमवारी संसदेत देण्यात आली. याशिवाय नेपाळमध्ये अडकलेल्या आणि भारतात येण्यास इच्छुक विदेशी पर्यटकांसाठी मोफत व्हिसाची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांत सकाळी कामकाज सुरू होताच शनिवारी नेपाळ आणि देशातील काही राज्यांत आलेल्या विनाशकारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या संकटसमयी शेजारील देशाला मदत पोहोचविण्यास भारताने दाखविलेल्या तत्परतेबद्दल सर्व सदस्यांनी सरकारची प्रशंसा केली. यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी देशातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला.
लोकसभेत संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी तो त्वरित मान्य केला. भारतात भूकंपात मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा ७२ वर पोहोचला असून यात बिहार ५६, उत्तर प्रदेश १२ आणि राजस्थान व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक जण मृत्युमुखी पडला आहे. या संकटसमयी संपूर्ण देश नेपाळच्या पाठीशी उभा आहे, अशी ग्वाही काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. तसेच केंद्र सरकारने राज्यांना आपत्ती व्यवस्थापन दल स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली.
भूकंपाची सूचना पंतप्रधानांनी दिली
देशाचा गृहमंत्री या नात्याने नेपाळ आणि देशातील काही राज्यांमध्ये आलेल्या भूकंपाची सूचना पहिले मला मिळायला हवी होती. परंतु सर्वप्रथम पंतप्रधानांनी मला याबाबत सूचना दिली, या केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने कडाडून टीका केली. ‘गुप्तचर विभागाला अशा कुठल्याही घटनेची सूचना प्रथम पंतप्रधानांना आणि नंतर गृहमंत्र्यांना देण्याची सूचना देण्यात आल्या आहेत काय? कारण अशा प्रकरणात गृह मंत्रालयाला प्राधान्य दिले जात असते’, असा सवाल काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला. सिंग यांची फिरकी घेताना ते म्हणाले, भूकंपानंतर लगेच नेपाळला मदत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा करून या आपत्तीची पहिली सूचना पंतप्रधानांना मिळाली होती हे गृहमंत्र्यांनी कबूल केले आहे. सरकार गृहमंत्रालयाला फारसे महत्त्व देत नाही, हे यावरून स्पष्ट होते.

४राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ)विविध भारतीय संस्थांनी नेपाळमध्ये मदतकार्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरील संदेशात प्रशंसा केली.

४‘सेवा परमो धर्म’ हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. भारताच्या १२५ कोटी जनतेने नेपाळचे दु:ख स्वत:चे मानत मदत देऊ केली आहे, असे ते संदेशात म्हणाले.

४केरळचे शंभरावर पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून केरळचे मंत्री के.सी. जोसेफ समन्वय राखण्यासाठी दिल्लीला गेले असल्याची माहिती मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी तिरुवनंतपुरम येथे दिली.

४भूकंपाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमाने पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका; असे आवाहन दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. देशवासीयांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही. यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाल्यास शासनातर्फे योग्य पावले उचलली जातील.


अशी ग्वाही संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली.


४देशात अनेक राज्यांना धक्का देणाऱ्या शक्तिशाली भूकंपातील मृत्यूसंख्या ७२ झाली असून भूकंपानंतरच्या शक्तिशाली धक्क्यांमुळे (आॅफ्टरशॉक)झालेल्या पडझडीत २८८ जण जखमी झाले. केरळचे शंभरावर पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडल्याची माहिती मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी दिली आहे.

४ दरम्यान केंद्राच्या आंतर मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चमू नेपाळमध्ये मदतकार्यात समन्वय राखण्यासाठी पोहोचली आहे. सर्वाधिक झळ बिहारला बसली असून या राज्यात ५६, उत्तर प्रदेशात १२, प. बंगालमध्ये ३ तर राजस्थानमध्ये एकाचा मृत्यू झाला.

४भारताने ‘आॅपरेशन मैत्री’अंतर्गत नेपाळमध्ये मदतकार्य चालविले असून गृह, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चमू मदत आणि बचाव कार्यात समन्वय राखण्यासाठी काठमांडूला पोहोचला आहे.

४गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बी.के. प्रसाद यांच्या नेतृत्वातील चमू नेपाळमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेवरही निगराणी ठेवेल. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय पथक नेपाळला पाठविण्याचा निर्णय झाला.

Web Title: 2500 Indians safely return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.