‘वंदे भारत’ने वाचवले लोकांचे २५०० तास; राजस्थानात ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 06:16 AM2023-04-13T06:16:33+5:302023-04-13T06:16:50+5:30
राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.
जयपूर :
राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेमुळे देशवासीयांचे प्रवासातील आतापर्यंत २५०० तास वाचले, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमात सामील झाले. त्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जयपूरहून सकाळी साडेअकराच्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली कॅन्टोन्मेंटसाठी रवाना झाली. मोदी गेहलोत यांना म्हणाले, तुमच्या दोन्ही हातात लाडू आहेत. रेल्वेमंत्री राजस्थानचे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही राजस्थानचे आहेत. २०१४ नंतर रेल्वेत झपाट्याने बदल सुरू झाले. वंदे भारत रेल्वेने जयपूरहून दिल्लीला जाणे सोपे होईल. या रेल्वेमुळे राजस्थानच्या पर्यटनालाही मदत होणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी वंदे भारत रेल्वे आहे, जिचे लोकार्पण झाले, असे मोदी म्हणाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि इतर काँग्रेस-भाजप नेतेही उपस्थित होते.
रेल्वेला राजकारणाचा आखाडा बनवले होते...
वंदे भारत रेल्वे भारताला एका विकासाच्या प्रवासाकडे घेऊन जाईल. रेल्वेसारख्या महत्त्वाच्या यंत्रणेलाही रेल्वे भरतीच्या माध्यमातून राजकारणाचा आखाडा बनवण्यात आले होते हे देशाचे दुर्दैव आहे.
६० लाख प्रवाशांना लाभ
वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६० लाख लोकांनी या गाड्यांमधून प्रवास केला आहे. गती हे तिचे वैशिष्ट्य आहे. यामुळे वेळेची बचत होत आहे. देशभरात धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेमुळे लोकांचे २५०० तास वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
संकटात असतानाही...
मुख्यमंत्री गेहलोत यांनी रेल्वेशी संबंधित काही मागण्या केल्या आहेत, याकडे लक्ष वेधून मोदी म्हणाले, ‘एक मित्र म्हणून, तुम्ही (गेहलोत) दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. मी गेहलोतजींचे विशेष आभार व्यक्त करतो की, सध्या राजकीय संकटात असतानाही त्यांनी विकासकामांसाठी वेळ काढला, रेल्वेच्या कार्यक्रमात भाग घेतला.