पद्म पुरस्कारांसाठी 2,500 नामांकने
By Admin | Published: July 6, 2017 07:33 PM2017-07-06T19:33:46+5:302017-07-06T19:33:46+5:30
पद्म पुरस्कारांच्या नामांकनांची प्रक्रिया सुरु झाली असून आतापर्यंत केंद्र सरकारकडे 2,500 नामांकने आली आहेत.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 06 - देशातील मानाचे पुरस्कार म्हणून पद्म पुरस्कारांकडे बघितले जाते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. पुढील वर्षी म्हणजेच 2018च्या पद्म पुरस्कारांच्या नामांकनांची प्रक्रिया सुरु झाली असून आतापर्यंत केंद्र सरकारकडे 2,500 नामांकने आली आहेत.
2018च्या पद्म पुरस्कारांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतून जवळपास 2,500 नामाकंने आली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. गेल्यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी 18,761 नामांकने आली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने तयार केलेल्या www.padmaawards.gov.in या पद्म पोर्टलवर पद्म पुरस्कारांसाठी फक्त ऑनलाइन नामांकने किंवा शिफारसी स्वीकारल्या जात आहेत. यासाठी नामांकन करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2017 आहे.
भारतातील तसेच भारताबाहेरील राजकारण, साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, विज्ञान यांसारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या व्यक्तींना पद्म पुरस्कार दिला जातो. अशा व्यक्तींची शिफारस राज्य सरकार, मंत्रालये, केंद्र सरकार, भारतरत्न आणि पद्म विभूषण पुरस्कार विजेते, केंद्र आणि राज्यमंत्री, राज्यांतील मुख्यमंत्री आणि राज्यपाल, खासदार यांसारख्या व्यक्ती करतात केंद्र सरकारकडे करतात. याचबरोबर यावर्षी केंद्र सरकारने पुरस्कार प्रदानात पारदर्शकता यावी म्हणून सामान्य नागरिकांचा देखील सहभाग यात सामील करण्यात आला आहे. त्यामुळे आता सामान्य व्यक्ती देखील पुरस्काराविषयी शिफारस करू शकतात.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व-संध्येला पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्काराची यादी घोषित केली जाणार आहे.