परदेशात तब्बल 276 भारतीयांना कोरोनाची लागण, एकट्या इराणमध्ये आढळले 255 रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:14 PM2020-03-18T13:14:15+5:302020-03-18T15:33:14+5:30
इराणमधील कोम शहरात राहणाऱ्या एका यात्रेकरूने सार्वजनिक केलेल्या एका यादीनुसार, भारतीय डॉक्टरांनी तपासनी केल्यानंतर तब्बल 254 भारतीयांना कोरोनोची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
तेहरान/नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याचा फटका आता भारतालाही बसायला सुरुवात झाली आहे. परदेशात तब्बल 276 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 255 जण एकट्या इराणमध्ये आढळून आले आहेत. तर 12 जण यूएईमध्ये आढळल्याची माहिती नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने लोकसभेत देण्यात आली.
276 Indians infected with coronavirus abroad, number includes 255 in Iran and 12 in UAE: MEA to Lok Sabha
— Press Trust of India (@PTI_News) March 18, 2020
चीननंतर कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली आणि इराणला बसला आहे. यापूर्वी इराणमध्ये 254 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यात काही विद्यार्थी आणि प्रवासी नागरिकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
इराणमधील कोम शहरात राहणाऱ्या एका यात्रेकरूने सार्वजनिक केलेल्या एका यादीनुसार, भारतीय डॉक्टरांनी तपासनी केल्यानंतर तब्बल 254 भारतीयांना कोरोनोची लागण झाल्याचे आढळून आल्याचे वृत्त होते. मात्र, आता खुद्द परराष्ट्र मंत्रालयानेच लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार हा आकडा 255 असल्याचे निश्चित झाले आहे.
कोरोनाची लागण झालेले अधिक जण कोम शहरातील -
येथे भारतीय प्रवासी आणि विद्यार्थ्यांना गटा-गटांत वेगळे केले आहे. यापैकी अधिक जण कोम शहरात आहेत, तर काही जण तेहराणमध्ये आहेत. येथील एकाने म्हटले आहे, की इराणमधील अधिकाऱ्यांनी संक्रमित असलेल्या लोकांना ते निगेटिव्ह असल्याचे सांगितले होते.
कोरोणाचा इराणमधील क्यूम भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. येथे भारतीय नागरिकांची तपासणी करण्यासठी पुण्याहून डॉक्टरांचा एक चमू पाठवण्यात आला आहे. यापूर्वी परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी म्हटले होते, की यासंदर्भात आम्ही तुर्तास कसल्याही प्रकारची पुष्टी करू शकत नाही. मात्र, या अधिकाऱ्यांनी असेही म्हटले होते, की अशा लोकांच्या यादीसंदर्भात त्यांना माहिती मिळाली आहे. मात्र ही यादी खरी आहे, की नाही यासंदर्भात सांगता येणार नाही.
इराणमध्ये कोरोना एवढ्या मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे, त्यामुळे काही भारतीयांमध्ये पॉझिटीव्ह केसेस आढळतीलही. मात्र आम्ही आश्वासन देतो, की तेथील भारतीयांच्या संरक्षणासंदर्भात ईरान सरकारच्या मदतीने योग्य प्रकारे काम सुरू आहे. राजदुतांचेही या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे, असे परराष्ट्रमंत्रालयाचे अतिरिक्त सचीव डी. रवी यांनी मंगळवारी म्हटले होते.