“राणाला आणणे भारताचा मोठा विजय, आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर”; PM मोदींचेही केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 20:54 IST2025-04-10T20:51:00+5:302025-04-10T20:54:01+5:30
Tahawwur Rana Extradition To India: तहव्वूर राणाला भारतात आणले जाणे हा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया २६/११ च्या हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तींनी दिली आहे.

“राणाला आणणे भारताचा मोठा विजय, आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर”; PM मोदींचेही केले कौतुक
Tahawwur Rana Extradition To India: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले गेले आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली. अखेरीस तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले. आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तहव्वूर राणाला भारतात आणल्याबाबत केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातून सहीसलामत वाचलेले आणि ज्यांनी कसाबची ओळख पटण्याबाबत न्यायालयात अतिशय महत्त्वाची साक्ष दिली, त्या नटवरलाल रोटावन आणि देविका रोटावन यांनी तहव्वूर राणाला भारतात आणल्याबाबत समाधान व्यक्त केले असून, फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कौतुकोद्गार काढले आहेत.
राणाला आणणे भारताचा मोठा विजय, आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर
तहव्वूर राणाला भारतात आणले आता डेविड हेडली, हाफिज सईदचा नंबर आहे. आम्ही भारतीय आहोत. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा बिमोड केला. तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा सुनावली जाईल, तेव्हा भारताचा जयजयकार केला जाईल. तहव्वूर राणाला भारतात आणले जाणे हा मोठा विजय असल्याचे नटवरलाल रोटावन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानात असलेल्या अन्य मास्टरमाइंड दहशतवाद्यांना भारतात आणून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी देविका रोटावन यांनी व्यक्त केली.