कोरोनाचा परिणाम : लोकांच्या हातात २६ लाख कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 01:22 AM2020-09-29T01:22:17+5:302020-09-29T01:22:50+5:30
कोरोनाचा परिणाम : सार्वकालिक उच्चांक; हातातील रोकड साठा संपला
मुंबई/नवी दिल्ली : भारतातील चलनात म्हणजेच लोकांच्या हातात असलेल्या नोटा पहिल्यांदाच विक्रमी २६ लाख कोटी रुपयांवर गेल्या आहेत. कोविड-१९च्या काळात लोकांनी आपल्याकडील रोख रकमेचा साठा वाढविल्यामुळे चलनातील नोटा वाढल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या डाटानुसार, चलनातील नोटांचे प्रमाण नव्या उच्चांकावर गेले असले तरी मागील दोन महिन्यांपासून वाढीची गती मंदावली आहे. ११ सप्टेंबरला संपलेल्या पंधरवड्यात लोकांच्या हातातील चलन १७,८९१ कोटी रुपयांनी वाढून २६ लाख कोटी रुपयांवर गेले. २८ फेब्रुवारी २०२० रोजी चलनात २२.५५ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. तेव्हापासून लोकांच्या हातातील चलनात ३.४५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
नोटांबदीच्या आधी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनात १७.९७ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. नोटाबंदीनंतर अल्पकाळासाठी चलनातील नोटांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले होते. उदा. जानेवारी २०१७ मध्ये चलनातील नोटा घसरून ७.८ लाख कोटी रुपयांवर आल्या होत्या. तथापि, ही स्थिती फार काळ टिकून राहू शकली नाही. चलनातील नोटा त्यानंतर झपाट्याने वाढत गेल्या. आता त्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली. परिणामी साठविलेल्या पैशांवर त्यांना गुजराण करावी लागली.
२०१६ मध्ये सरकारने नोटांबदी जाहीर केली तेव्हा ‘देशाची अर्थव्यवस्था रोखविरहित करण्यासाठी’ हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात होते. तथापि, सरकारचा हा उद्देश तर साध्य झाला नाहीच, उलट नोटाबंदीनंतर आतापर्यंत चलनी नोटांत ४५ टक्के वाढ झाली आहे.