CoronaVirus: कोरोना घुसला नौदलात; ‘आयएनएस आंग्रे’वर २६ नौसैनिक व कर्मचाऱ्यांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 05:07 AM2020-04-19T05:07:16+5:302020-04-19T06:54:03+5:30
नौदलाच्या कोणत्याही युद्धनौकेवर किंवा पाणबुडीवर कोणालाही कोरोनाची लागण नाही; सूत्रांची माहिती
मुंबई : भारतीय नौदलाच्या मुंबईतील एका तळावर २६ नौसैनिकांना व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या संपूर्ण नौदल आस्थापनात ‘लॉकडाउन’ करण्यात आले आहे. मात्र नौदलाच्या कोणत्याही युद्धनौकेवर किंवा पाणबुडीवर या साथीची कोणालाही लागण झालेली नाही, असे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनुसार लागण झालेल्यांमध्ये ‘आयएनएस आंग्रे’ या जमिनीवरील नौदल आस्थापनेतील २० नौसैनिक आहेत. आधी ७ एप्रिल रोजी एका नौसैनिकाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली व त्याच्याकडून इतरांना लागण झाली. मात्र लागण झालेल्यांपैकी बहुतेकांना कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. त्यांना नौदलाच्या ‘आयएनएस अश्विनी’ या इस्पितळात क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. लागण झालेले नौसैनिक ‘बॅचलर्स अकोमोडेशन’मध्ये राहणारे आहेत. त्यांचा इतर ज्यांच्याशी संपर्क आलेला असू शकतो अशांचा शोध घेण्यात येत आहे.
फ्रेंच युद्धनौकेवरही १००० जणांना लागण
पॅरिस: फ्रान्सच्या नौदलाची ‘चार्लस-डी-गॉल’ ही विमानवाहू आण्विक युद्धनौका अटलांटिक महासागरात तैनातीवर असताना तिच्यावरील १,०८१ नौसैनिक व अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी संसदेत सांगितले.
त्यांनी असेही सांगितले की, युद्धनौकेस १० दिवस आधी परत आणण्यात आले. सर्व नौसैनिकांची व कर्मचाºयांची चाचणी घेतली गेली. संसर्ग झालेल्यांमध्ये ५६५ नौसेनिक असून त्यापैकी २४ जणांना इस्पितळात एकाला अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. इतरांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले.
ही युद्धनौका १३ मार्च रोजी फ्रान्सहून रवाना झाल्यापासून तिच्यावरील नौसैनिकांचा बाहेरच्या कोणाशीही संपर्क आलेला नसतानाही एवढ्या मोठ्या संख्येने संसर्ग कसा झाला हे कोडे मात्र अद्याप उलगडलेले नाही.