शहिदांच्या कुटुंबासाठी 6 दिवसांत जमवले 6 कोटी; सामान्य व्यक्तीची असामान्य मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:32 PM2019-02-20T15:32:02+5:302019-02-20T15:34:02+5:30
शहीद जवानांच्या कुटुंबासाठी धावला एनआरआय तरुण
नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबद्दल देशभरात संतापाची भावना आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. पाकिस्तानमधल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे पाकिस्तानबद्दल देशवासीयांच्या मनात संतापाची लाट आहे. जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्याची मागणी संपूर्ण देशाकडून केली जात आहे. मात्र शहीद जवानांच्या कुटुंबांना मदतीचा हात देणंदेखील तितकंचं गरजेचं आहे. त्यासाठी एक एनआरआय तरुण पुढे सरसावला आहे. त्यानं शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी 6 दिवसांमध्ये 6 कोटीपेक्षा अधिक रक्कम गोळा केली आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या 26 वर्षीय विवेक पटेलनं शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन फेसबुकवरुन केलं. 14 फेब्रुवारीला पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मदतीचं आवाहन करणारी पोस्ट त्यानं फेसबुकवर लिहिली. अमेरिकन डेबिट/क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 'भारत के वीर' या सरकारी संकेतस्थळावर मदत देणं तांत्रिक कारणामुळे शक्य होत नव्हतं. यासाठी विवकेनं फेसबुकच्या माध्यमातून मदतनिधी उभा करण्याचं ठरवलं. किमान 5 लाख डॉलर म्हणजेच साडे तीन लाख रुपयांचा निधी उभारण्याचं लक्ष त्यानं ठेवलं होतं. मात्र त्याच्या आवाहनाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि अवघ्या सहा दिवसांमध्ये 6 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली.
फेसबुकवर मदतीचं आवाहन केल्यानंतर जगभरातून फोन आल्याचं विवेकनं सांगितलं. 'एका स्थानिक रेडिओ स्टेशननं याबद्दल मदतीचं आवाहन केलं. जमा केलेला निधी शहीद जवानांच्या कुटुंबापर्यंत कसा पोहोचणार, असा प्रश्नदेखील काहींनी विचारला. फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून या शंकांचं निरसन करण्यात आलं,' अशी माहिती विवेकनं दिली. मदतनिधी जमा होऊ लागताच विवकेनं सतत याबद्दलची माहिती लोकांना दिली. जमा झालेला मदतनिधी योग्य हातांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सध्या विवेक करतो आहे. जवानांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. त्यापुढे कितीही आर्थिक मदत कमीच ठरेल, अशी भावना विवेकनं व्यक्त केली.