26/11च्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार झाकी उर रेहमान लखवी आज सुटणार
By admin | Published: April 9, 2015 03:11 PM2015-04-09T15:11:27+5:302015-04-09T15:28:03+5:30
मुंबईवरील 26/11 चा सूत्रधार झाकी उर रेहमान लखवीला अटकेत ठेवण्याचा पंजाब सरकारचा आदेश बेकायदेशीर असल्याचे सांगत लाहोर हायकोर्टाने लखवीचा तुरुंगाबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 9 - मुंबईवरील 26/11 चा सूत्रधार झाकी उर रेहमान लखवीला अटकेत ठेवण्याचा पंजाब सरकारचा आदेश निकालात काढत लाहोर हायकोर्टाने लखवीचा तुरुंगाबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला आहे. लखवीच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे लखवीच्या वकिलांचा दावा आहे, तर लखवीच्या विरोधात कायदेशीररीत्या अत्यंत भक्कम अशी केस मांडण्यात आलेली नसल्याचा दावा कायदेतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
लखवी या मुख्य सूत्रधारासह, अब्दुल वाजिद, मझहर इक्बाल, हमद सादिक, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद आणि युनूस अंजुम यांच्यावर मुंबईवरील हल्ल्याचे नियोजन करणे आणि तो घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणे असे आरोप आहेत.
लखवीला तसेच मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या सगळ्या गुन्हेगारांना कडक शासन व्हावं अशी इच्छा भारताने वारंवार व्यक्त केली आहे. परंतु, पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती आणि कायदेशीर यंत्रणा भारतावर हल्ले करणा-यांबाबत गंभीर नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. सखवीच्या सुटकेमुळे भारत - पाक संबंधांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पंजाब सरकारच्या विरोधात निर्णय देताना लाहोर सरकारने असे स्पष्ट केले आहे की, लखवीच्या विरोधात जे पुरावे सादर करण्यात आले, जी गुप्त कागदपत्रे सादर करण्यात आली ती लखवीला तुरुंगात ठेवण्याएवढी पुरेशी नाहीत. त्यामुळे लखवीला कैदेतून मोकळे करावे असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
लखवीच्या वकिलांच्या सांगण्यानुसार लखवी आज संध्याकाळपर्यंत तुरुंगाबाहेर येऊ शकतो.