सराफांच्या संपाला २७ दिवस पूर्ण
By admin | Published: March 29, 2016 01:39 AM2016-03-29T01:39:44+5:302016-03-29T01:39:44+5:30
चांदीव्यतिरिक्त इतर दागिन्यांवरील नियोजित एक टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ देशभर सुरू असलेल्या दागिने आणि सराफांच्या संपाने सोमवारी २७ दिवस पूर्ण केले.
नवी दिल्ली : चांदीव्यतिरिक्त इतर दागिन्यांवरील नियोजित एक टक्का अबकारी कराच्या निषेधार्थ देशभर सुरू असलेल्या दागिने आणि सराफांच्या संपाने सोमवारी २७ दिवस पूर्ण केले. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईतील बहुतेक सराफा व दागिन्यांची दुकाने बंद होती. या कराच्या निषेधार्थ सराफ, सोन्या-चांदीचे व्यापारी आणि कारागीर दोन मार्चपासून संपावर आहेत.
हा संप राजस्थानातील जयपूर, अजमेर, जोधपूर, उदयपूर आणि मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, जबलपूर व रतलाम येथेही सुरू आहे. तथापि, तामिळनाडूतील बहुतेक सराफांची दुकाने सुरू होती.
कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स आणि आयबीजेएसएफने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना या प्रश्नात हस्तक्षेप करून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.
जेटली यांनी छोट्या व्यावसायिकांना त्रास होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन देताना महागड्या दागिन्यांची कर आकारणीतून सुटका नाही, असे स्पष्ट केले.
१ टक्का अबकारी कराच्या विरोधात अर्थसंकल्पाच्या दिवसापासून सराफा व्यापारी आंदोलन करीत आहेत. वस्तू आणि सेवा करान्वये जीवनावश्यक वस्तूही कराच्या कक्षेत येत असताना सोन्याला करातून सूट देणे शक्य नाही, असे जेटलींनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)