सूड घेण्यासाठी केली 27 भटक्या कुत्र्यांची हत्या
By Admin | Published: October 28, 2016 10:37 AM2016-10-28T10:37:07+5:302016-10-28T10:42:05+5:30
तिरुअनंतपरुम येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 90 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर सूड घेण्यासाठी 27 भटक्या कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. 28 - तिरुअनंतपरुम येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 90 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर सूड घेण्यासाठी 27 भटक्या कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी ही घटना घडली आहे. पीडित व्यक्ती आपल्या घराबाहेर बसली असताना पाच भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर जनसेवा शिशुभवनच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी 27 भटक्या कुत्र्यांची हत्या केली.
पोलिसांनी या माहितीला दुजोरा दिला असून कुत्र्यांची हत्या झाल्याचं सांगितलं आहे. 'आम्ही सकाळी 10 वाजता घटनास्थळी पोहोचलो, पण तोपर्यंत सर्व काही घडून गेलं होतं. जनसेवा शिशुभवनचे प्रमुख मावेली आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी जेव्हा मावेली यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी मानवी साखळी करत विरोध केला. आम्हीच त्यांना बोलावलं होतं असा दावा स्थानिकांनी केला आहे. जर अटक झाली तर पोलीस ठाण्यासमोर मृत कुत्र्यांना घेऊन आम्ही आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला.
'स्थानिकांच्या विनंतीनंतर मी येथे आलो. मी निर्दोष आहे. मी काहीच चुकीचं केलेलं नाही, आणि हे लोक मला अटक होऊ देणार नाहीत,' असं मावेली पत्रकारांशी बोलताना बोलले आहेत. आमचं घर आणि आम्ही सुरक्षित नसल्याने आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं एका स्थानिकाने सांगितलं आहे. यावेळी स्थानिकांनी मनेका गांधी यांच्यावरही टीका केली. 'एसी कारमध्ये फिरणा-या मंत्र्यांना भटकी कुत्री किती धोकादायक आहेत कळणार नाही. हे फक्त सामान्य माणसाला कळू शकतं,' अशा भावना संतापलेल्या स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.