२७ तास चकमक, कर्तव्य बजावताना लष्कराच्या ‘फॅंटम’चे बलिदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 06:04 AM2024-10-30T06:04:14+5:302024-10-30T06:04:53+5:30
लष्कराच्या के९ या श्वान पथकाचा तो सदस्य होता. दहशतवादविरोधी कारवाईमध्ये हे श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावते.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील अखनूर क्षेत्रात लष्कराच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेवर गोळीबार करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांचा लष्करी जवानांनी खात्मा केला. ही चकमक सुमारे २७ तास सुरू होती. हल्लेखोरांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान लष्कराच्या पथकातील फँटम हा श्वान आपले कर्तव्य बजावत असताना, त्याचा दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू झाला. त्याचे वय साडेचार वर्षांचे होते.
फँटम हा आमचा खरा हिरो आहे. त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे, असे लष्करातील व्हाइट नाइट कॉर्प्सने म्हटले आहे. बेल्जियम मालिनॉइस या जातीचा श्वान असलेल्या फॅंटमचा जन्म २५ मे २०२० रोजी झाला होता. लष्कराच्या के९ या श्वान पथकाचा तो सदस्य होता. दहशतवादविरोधी कारवाईमध्ये हे श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावते.
मेरठ येथील रिमाऊंट व्हेनरिनरी कॉर्प्सकडून मिळालेला फॅंटम हा श्वान १२ ऑगस्ट २०२२ रोजी के९मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. फॅंटमचे बलिदान कोणीही विसरू शकणार नाही, असे व्हाइट नाइट कॉर्प्सने म्हटले. अखनूर येथे प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील प्रदेशातून लष्कराचा ताफा जात असताना, दहशतवाद्याने रुग्णवाहिकेवर गोळीबार केला होता.