27 वर्षांच्या युवतीने सुरू केला गाईच्या दुधाचा व्यवसाय, 2 वर्षांत 1 कोटी रुपयांचा टर्नओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 10:56 AM2020-03-17T10:56:13+5:302020-03-17T10:59:34+5:30
शिल्पी या 2012 मध्ये बेंगळुरू येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. येथे गाईचे शुद्ध दूध मिळवण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या आणि येथूनच आपणच शुद्ध गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू करावा, असा निर्णय त्यांनी घेतला.
नवी दिल्ली - कल्पना शक्ती आणि कुठलेही काम हटके करण्याची क्षमता असेल, तर यश तुमच्या पायाशी लोळण घेते. हे सिद्ध केले आहे झारखंडमधील डाल्टनगंज येथील शिल्पी सिन्हा यांनी. शिल्पी यांनी बेंगळुरूमध्ये गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी केवळ 11 हजार रुपयांपासून सुरू केलेल्या या कंपनीचा टर्नओव्हर पहिल्याच दोन वर्षांत एक कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
शिल्पी या 2012 मध्ये बेंगळुरू येथे शिक्षणासाठी आल्या होत्या. येथे गाईचे शुद्ध दूध मिळवण्यासाठी त्यांना बऱ्याच अडचणी आल्या आणि येथूनच आपणच शुद्ध गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू करावा, असा निर्णय त्यांनी घेतला. मात्र महिला आणि कंपनीच्या एकमेव फाउंडर म्हणून डेअरी व्यवसायात काम करणे सोपे नव्हते. त्यांना ना कन्नड भाषा येत होती, ना तमिळ. तरीही त्या शेतकऱ्यांकडे जाऊन गाईच्या चाऱ्यापासून ते तिच्या देखभालीपर्यंत सर्व गोष्टी समजून सांगत होती.
सुरुवातीला दूध पुरवठा करण्यासाठी कर्मचारी मिळत नव्हते. यामुळे त्यांना सकाळी तीन वाजताच शेतात जावे लागत. शेतावर जाताना स्वसंरक्षणासाठी त्या चाकू आणि मिर्ची स्प्रे देखील जवळ ठेवत असत. ग्राहकांची संख्या 500 वर पोहोचल्यानंतर शिल्पी यांनी केवळ 11 हजार रुपयांच्या फंडापासून 6 जनवरी 2018 रोजी 'द मिल्क इंडिया कंपनी' सुरू केली आहे. या कंपनीचा पहिल्या दोन वर्षांतील टर्नओव्हर तब्बल एक कोटींवर पोहोचला आहे.
1 ते 9 वर्षांच्या मुलांवर लक्ष्य -
शिल्पी सांगतात, की आमची कंपनी 62 रुपए प्रति लीटर दराने गाईचे शुद्ध कच्चे दूधच विकते. त्यांच्यामते हे दूध पिल्याने मुलांची हाडे बळकट होतात आणि शरिरातील कॅल्शियमदेखील वाढायला मदत होते. यामुळे आम्ही केवळ 1 ते 9 वर्षांच्या मुलांवरच अधिक फोकस करतो. एवढेच नाही, तर या दूधाची गुनवत्ता वाढवण्यासाठीही कंपनी विशेष प्रयत्न करते.
मुलांचे वय एकावर्षांपेक्षा कमी असेल तर दूध देत नाही -
कोणतीही ऑर्डर घेताना मुलाच्या बाळाच्या आईला आधी मुलाच्या वयासंदर्भात विचारणा केली जाते. जर मुलगा एक वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर, त्यांना ही कंपनी दूध देत नाही, असेही शिल्पी सांगतात.