लडाखला बाईकवर गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांना शेवटचा फोन करुन सांगितली होती व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 08:53 PM2024-09-02T20:53:44+5:302024-09-02T20:54:42+5:30
नोएडातल्या तरुणाचा लडाखमध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्यीच धक्कादायक घटना समोर आली आहे.
Death in Ladakh Bike Trip: प्रवासाची आवड असलेल्या लोकांना आयुष्यात एकदा तरी लेह-लडाखला भेट बाईकवरुन द्यायची असते. त्यामुळे अनेक तरुण तरुणी हे बाईकवरुनच लडाखला निघतात. मात्र असे करणे एका तरुणाला महागात पडले आणि त्याची किंमत त्याला जीव देऊन चुकवावी लागली. ऑक्सिजनअभावी या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नोएडा येथील २७ वर्षीय तरुण लडाखमधील लेहला जाण्यासाठी बाईकवरुन एकटाच निघाला होता. परंतु लडाखमधील उंच भागात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याची प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला. चिन्मय शर्मा असे मृत तरुणाचे नाव असून तो नोएडा येथील एका डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करत होता. त्याचे आई वडील मुझफ्फरनगरमध्ये राहत होते. चिन्मय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चिन्मय शर्माने २२ ऑगस्टला लडाखसाठी प्रवास सुरू केला. सुमारे ३५०० मीटर उंचीवर असलेल्या लेहला पोहोचल्यावर त्याने वडिलांना डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे फोनवर सांगितले होते. थोड्यावेळाने पुन्हा चिन्मयने वडिलांना फोन करुन श्वास घेण्यास त्रास होतोय असं सांगितले. मुलाची प्रकृती ठीक नसल्याचे कळल्यानंतर चिन्मयचे वडील पराग शर्मा यांनी लेहमधील हॉटेल कर्मचाऱ्यांना फोन करून मुलाला रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर चिन्मयचे आई-वडीलही लेहला निघाले.
मात्र त्याआधीच २७ वर्षीय चिन्मय शर्माची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चिन्मयचे पार्थिव मुझफ्फरनगर येथे आणण्यात आले. शुक्रवारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, लडाखला येणाऱ्या बाहेरील लोकांना उंचावरील भागात ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल किंवा निवासस्थानी दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांचे शरीर कमी ऑक्सिजन पातळीशी जुळवून घेऊ शकेल. अल्टिट्यूड सिकनेसला अॅक्युट माउंटन सिकनेस असेही म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला उंचांवर श्वास घेण्यास सामना करावा लागतो तेव्हा असं घडते. यावेळी डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, थकवा आणि निद्रानाश या गोष्टींचा त्रास सुरु होतो.