राहुल, सुप्रियासह 28 खासदारांना मिळणार सर्जिंकल स्ट्राईकची माहिती
By admin | Published: October 17, 2016 10:55 AM2016-10-17T10:55:47+5:302016-10-17T10:55:47+5:30
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता सर्जिकल स्ट्राईकची माहिती 28 खासदारांना देण्यात येणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता सर्जिकल स्ट्राईकची माहिती 28 खासदारांना देण्यात येणार आहे . या 28 जणांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश असणार आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत राहुल गांधी, वरुण गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह 28 खासदारांचा समावेश आहे.
लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंगळवारी बैठक होईल. या बैठकीत परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव आणि लष्करी कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) हे खासदारांना सर्जिकल स्ट्राइकबाबत माहिती देतील. संसदीय समितीला अशी माहिती देण्यास सरकारने आधी नकार दिला होता.
काही दिवसांपुर्वी लष्कराने सर्जिंकल स्ट्राईक कारवाईची माहिती संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीसमोर मांडली होती. या बैठकीस समितीचे तीन सदस्य उपस्थित होते. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी भारतीय जवानांनी 29 सप्टेंबर रोजी केलेल्या लष्करी कारवाईचा लेखाजोखा सादर केला. त्यावेळी राजकीय पक्षांनाही लष्कराने नियंत्रण रेषा पार करुन केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकची माहिती दिली. यावेळी लष्कराने गरज पडल्यास पुन्हा सर्जिंकल स्ट्राईक करु असं सांगतिलं होतं.
नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्याच आधारे ही कारवाई करण्यात आली असं लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी समितीला सांगितलं होतं. बिपीन रावत यांनी संपुर्ण कारवाई कशाप्रकारे पार पाडली, कशाप्रकारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, तसंच आपले जवान सुरक्षितरित्या माघारी कसे आले यासंबंधी थोडक्यात माहिती दिली.
कॉंग्रेस नेते आणि समितीचे सदस्य मधुसुदन मिस्री यांनी या वेळी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला; पण पॅनलचे प्रमुख मेजर जनरल बी. सी. खांडुरी (निवृत्त) यांनी याबाबत बोलणे टाळले. या वेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे एका सदस्याने सांगितले. तत्पूर्वी संरक्षण मंत्रालयाचे प्रतिनिधी लक्ष्यभेदी हल्ल्याबाबत स्थायी समितीसमोर आपले म्हणणे मांडणार होते; पण नंतर त्यामध्ये बदल करण्यात आला होता. याला कॉंग्रेसच्या सदस्या अंबिका सोनी आणि मधुसूदन मिस्री यांनी आक्षेप घेतला होता, त्यांनी लष्कराच्या भूमिकेवरही टीका केली होती.