भाजपविरोधी घोषणा दिल्याने 28 वर्षीय विद्यार्थीनीला चक्क तुरुंगात टाकले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 09:23 AM2018-09-04T09:23:21+5:302018-09-04T09:25:52+5:30
चेन्नई - भाजपविरुद्ध घोषणाबाजी केल्यामुळे एका विद्यार्थीनीला अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यात ही घटना घडली. येथील 28 वर्षीय विद्यार्थीनी कॅनडा येथे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थीनीने विमानातून प्रवास करतेवेळी तामिळनाडूचेभाजपाध्यक्ष तामिलीसाई सौंदराराजन यांच्यासमोर भाजपविरोधी घोषणा दिल्या. तसेच विमानतळावर उतरल्यानंतरही या विद्यार्थीनीने हुकूमशाही भाजप सरकारला खाली खेचा, असे म्हणत भाजपविरोधी नारेबाजी केली होती.
लुईस सोफिया असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती कॅनडाहून आपल्या चेन्नईतील घरी परतत असताना ही घटना घडली. तामिळनाडूचे भाजपाध्यक्ष सौंदरराजन यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, सोफियाला अटक करण्यात आल्याचे तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. याप्रकरणी सोफियाला अटक केल्यानंतर 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सोफियाचे वकिल ई अथिसायकुमार यांनी दिली.
सोफियाविरुद्ध तामिळनाडू पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार आयपीसीच्या कलम 505, कलम 290 आणि कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर सोफियाला महिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी, न्यायालयाने तिला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे तुतीकोरीन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुरली रम्बा यांनी सांगितले. दरम्यान, तामिनाडूतील डीएमकेचे नेते एम.के. स्टॅलिन यांनी सोफियाच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच लाखो लोक भाजपविरुद्ध नारेबाजी करत आहेत, तुम्ही त्यांनाही अटक केली पाहिजे. मीही भाजपविरुद्ध नारेबाजी करतो, मलाही अटक करा, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. या घटनेने तामिळनाडूसह देशात खळबळ उडाली आहे.
I am on a flight with Tamilisai Soundarajan and really want to shout "மோடி-BJP-RSS இன் பாசிச ஆட்சி ஒழிக". Will I be kicked off the flight?
— Lois (@Red_Pastures) September 3, 2018