२८ वर्षे लिव्ह इनमध्ये, साठीनंतर केले लग्न; मुली बनल्या वऱ्हाडी, उत्तर प्रदेशातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 06:28 AM2021-06-23T06:28:55+5:302021-06-23T06:29:15+5:30
अमेठी जिल्ह्यात ६५ वर्षीय व्यक्तीने ६० वर्षीय महिलेशी लग्न केले.
अमेठी : ते २८ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिले आणि साठाव्या वर्षानंतर विवाहाचा योग जुळून आला... हे कोणत्याही चित्रपटाचे कथानक नाही. तर, उत्तर प्रदेशातील वास्तव आहे.
अमेठी जिल्ह्यात ६५ वर्षीय व्यक्तीने ६० वर्षीय महिलेशी लग्न केले. या विवाहासाठी गावात पत्रिकाही वाटण्यात आल्या. या दाम्पत्याची मुले, मुली, सुना, नातवंडेही या सोहळ्याला हजर होती. २८ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर विवाहाचा योग जुळून आल्याने हे दाम्पत्य खूपच आनंदात होते. खुटहाल गावात रविवारी रात्री उत्साहाचे वातावरण होते. लगीनघाई होती.
जीवनाला पूर्णत्व
मोतीलाल यांच्या घरी नातेवाइकांनी गर्दी केली होती. मोतीलाल यांच्या विवाहासाठीच ही वऱ्हाडी जमली होती. २८ वर्षे सोबत राहणाऱ्या मोहिनी देवी यांच्याशी हा विवाह होता. मोतीलाल म्हणाले की, समाजाने आमच्या दोघांचे नाते स्वीकारले होते. आता मुला-मुलींचे लग्न झाल्यानंतर आम्ही विवाह केल्याने जीवनाला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. मोतीलाल यांच्या दोन मुलीही या वऱ्हाडात सहभागी झाल्या होत्या.