२.९४ लाख रिक्त पदांसाठी रेल्वेने सुरू केली भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:02 AM2019-07-11T06:02:56+5:302019-07-11T06:03:22+5:30
१९९१मध्ये रेल्वेकडे १६,५४,९८५ कर्मचारी होते
नवी दिल्ली : यंदाच्या १ जून रोजीच्या आकडेवारीनुसार, रेल्वेमधील २.९८ लाख पदे रिक्त असून, त्यातील २.९४ लाख पदांच्या भरतीची प्रक्रिया रेल्वेने सुरू केली आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, गेल्या दहा वर्षांत रेल्वेत ४.६१ लाख लोकांची भरती करण्यात आली. रिक्त जागा भरणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. रेल्वेची कर्मचारी संख्या ठरविताना रजा राखीव (लिव्ह रिझर्व्ह) आणि प्रशिक्षणार्थी राखीव (ट्रेनी रिझर्व्ह) यासह अनेक घटक लक्षात घेतले जातात.
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गोयल म्हणाले की, १९९१मध्ये रेल्वेकडे १६,५४,९८५ कर्मचारी होते. २०१९ मध्ये १२,४८,१०१ कर्मचारी आहेत. कर्मचारी संख्या कमी झाली असली, तरी रेल्वेच्या सेवेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
रेल्वे भरती बोर्ड, तसेच रेल्वे भरती सेल यांच्यामार्फत रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाते. १ जून, २०१९ रोजी अ, ब, क आणि पूर्वाश्रमीच्या ड श्रेणीत २,९८,५७४ पदे रिक्त आहेत. त्यातील २,९४,४२० पदांची भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
खासगीकरण नाही
दरम्यान, रेल्वेच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत सांगितले. रेल्वेने दोन गाड्या खासगी संस्थांना चालवायला दिल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गोयल यांनी म्हटले की, ‘खासगी संस्थांना चालवायला देण्यासाठी अजून कोणतीही गाडी निश्चित करण्यात आलेली नाही.’
सरकारने अधिकृत माहिती दिली नसली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस खासगी संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.