'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:43 PM2020-06-08T13:43:24+5:302020-06-08T13:48:41+5:30
दोन तास लंच, त्यानंतर गाठतात घर; २९ IPS अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर डीजीपींचं बोट
भोपाळ: पोलीस महासंचालक विवेक जोहरी यांच्या एका पत्रामुळे सध्या पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. जोहरी यांच्या पत्रानं पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक आयपीएस अधिकारी कार्यालयात येतच नाहीत. तरीही वेतन घेतात. तर कार्यालयात येणारे काही अधिकारी दोन-दोन तास जेवत बसतात आणि जेवण होताच घर गाठतात, असे अतिशय गंभीर आरोप जोहरींनी त्यांच्या पत्रातून केले आहेत.
मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक असलेल्या विवेक जोहरी यांनी त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर पत्रातून बोट ठेवलं आहे. भोपाळमधील पोलीस मुख्यालयातील २९ अधिकाऱ्यांबद्दल जोहरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. '२९ पैकी १४ अधिकाऱ्यांना लंचसाठी २ तास लागतात. काही अधिकारी तर लंच होताच कार्यालयाचून निघून जातात. त्यानंतर ते कार्यालयात परततच नाहीत. तीन अधिकारी तर कार्यालयात येतच नाहीत. कोणतंही काम न करता ते वेतन आणि सर्व सरकारी सुविधा घेतात,' असं जोहरींनी पत्रात नमूद केलं आहे.
डीजीपींनी त्यांच्या पत्रात २९ अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला आहे. 'कामाच्या वेळेत अधिकारी त्यांच्या चेंबरमध्ये उपस्थित नसतात. काही अधिकारी लंचनंतर कार्यालयात येतच नाहीत,' असं जोहरींनी ६ जून रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी कामाला महत्त्व द्यावं. सर्व अधिकाऱ्यांनी सकाळी साडे दहा ते साडे पाच वेळेत कार्यालयात रहावं, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. स्पेशल डीजी, एडीजी आणि आयजी दर्जाचे अधिकारी कार्यालयात बसत नाहीत. फोन घेत नाहीत, हे खेदजनक आहे, अशा शब्दांत जोहरींनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
जोहरींनी त्यांच्या पत्रातून २९ अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाकडे लक्ष वेधलं आहे. 'तीन अधिकारी कार्यालयातच येत नाहीत. १२ जण लंचनंतर कार्यालयात परतत नाहीत. १४ अधिकाऱ्यांना लंच करायला २ तास लागतात,' अशी आकडेवारी डीजीपींनी पत्रात दिली आहे. मात्र त्यांनी कोणाचंही नाव पत्रात नमूद केलेलं नाही. अधिकाऱ्यांच्या अशा वर्तणुकीचा त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो. भविष्यात हे अधिकारी कार्यालयात उपलब्ध असतील, अशी अपेक्षा जोहरींनी व्यक्त केली आहे.
अरविंद केजरीवालांची तब्येत बिघडली; स्वत:ला केलं आयसोलेट, कोरोना टेस्ट होणार
बापरे! अवघ्या ५ दिवसांत ५००००; कोरोना रुग्णांचा वेग धडकी भरवणार
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी