काँग्रेसच्या दृष्टीने २९ कळीच्या जागा
By admin | Published: September 24, 2014 04:23 AM2014-09-24T04:23:27+5:302014-09-24T04:23:27+5:30
मागील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या १५ जागांवरील विजय हा ५ हजारांपेक्षा कमी मतांचा होता,
विवेक भुसे, पुणे
मागील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या १५ जागांवरील विजय हा ५ हजारांपेक्षा कमी मतांचा होता, तर १४ जागा त्यांना ५ हजारांपेक्षा कमी मतांनी गमवाव्या लागल्या होत्या़ जिंकलेल्या जागा टिकविणे आणि कमी अंतर असलेल्या जागा खेचून आणण्यासाठी काँग्रेसला मेहनत घ्यावी लागणार असून, त्यावर आघाडीचे यश अवलंबून राहणार आहे़
मागील विधानसभेत काँग्रेसचे ८२ आमदार निवडून आले होते़ त्यातील १५ आमदारांची विजयी मते ५ हजारांपेक्षा कमी होती़ त्यात प्रामुख्याने विदर्भातील रिसोड, मेळघाट, देवळी, सावनेर, आरमोरी, गडचिरोली, वरोरा या ७ मतदारसंघांचा समावेश आहे़ याशिवाय फुलंब्री, मुखेड, हिंगोली, कोल्हापूर (दक्षिण), अंधेरी पूर्व, विलेपार्ले, अक्कलकुवा, सिन्नर या कमी मताधिक्य असलेल्या मतदारसंघांमध्येही चुरस असणार आहे़ काँग्रेसला १४ मतदारसंघांत ५ हजारांपेक्षा कमी मतांनी पराभूत व्हावे लागले होते़ त्यात विदर्भातील जळगाव जामोद, अकोट, बाळापूर, आर्वी, नागपूर (पश्चिम), रामटेक आणि अर्जुनी मोरगाव या ७ मतदारसंघांचा समावेश आहे़ याशिवाय अक्कलकोट, कोल्हापूर (उत्तर), हातकणंगले, वांद्रे पूर्व, कणकवली आणि नवापूर या मतदारसंघांतील उमेदवारांचे मताधिक्य ५ हजार मतांपेक्षा कमी होते़