देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ जण करोडपती, या राज्याचे मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत, आकडेवारी आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 04:37 PM2023-04-12T16:37:14+5:302023-04-12T16:44:03+5:30
Richest Chief Ministers in India: राजकीय नेत्यांची संपत्ती हा आपल्याकडे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एका रिपोर्टमधील माहितीनुसार देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत.
राजकीय नेत्यांची संपत्ती हा आपल्याकडे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दरम्यान, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या रिपोर्टमधून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यातील माहितीनुसार देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे ५१० कोटी रुपयांची संपत्ती आहे. एडीआरने सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सर्वात कमी म्हणजे १५ लाख रुपये एवढी संपत्ती आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार एडीआर आणि इलेक्शन वॉच (न्यू) ने सांगितले की, ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व ३० मुख्यमंत्र्यंच्या शपथपत्रांचं विश्लेषण केल्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. देशातील २८ राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोन राज्यांमध्येही मुख्यमंत्री आहेत. मात्र जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात सध्या मुख्यमंत्री नाही आहे. एडीआरने सांगितले की, विश्लेषणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ जण कोट्यधीश आहेत. त्यांची सरासरी संपत्ती ही ३३.९६ कोटी रुपये एवढी आहे.
एडीआरच्या रिपोर्टनुसार ३० मुख्यमंत्र्यांमधील १३ (४३ टक्के) जणांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि धमकी या संबंधित फौजदारी गुन्हे दाखल आहेत. प्रतिज्ञापत्रामधून या नेत्यांनी याची माहिती दिली आहे. संपत्तीच्या बाबतीत पहिल्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ५१० कोटींच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू १६३ कोटींच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे ६३ कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नागालँडचे मुख्यमंत्री नैफ्यू रियो यांच्याकडे ४६ कोटींची संपत्ती आहे. तर पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी यांच्याकडे ३८ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
तर एडीआरनुसार सर्वात कमी घोषित संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. त्यांच्याकडे केवळ १५ लाख रुपये एवढीच संपत्ती आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे एक कोटी आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे प्रत्येकी एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. या रिपोर्टनुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी ३ कोटी रुपये एवढी संपत्ती आहे.