तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 09:45 PM2024-09-07T21:45:40+5:302024-09-07T21:45:51+5:30
तेलंगणात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती सरकारने दिली.
Telangana Flood : तेलंगणात आठवड्याभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला आहे. तेलंगणात अतिवृष्टी आणि पुराच्या अलीकडील घटनांमुळे नागरिकांनी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. अशातच गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे तेलंगणात आतापर्यंत २९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
तेलंगणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. ३१ ऑगस्टच्या पुरामुळे तेलंगणातील मीनावलू, पेड्डागोपावरम, मन्नूर आणि कट्टेलरू जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तेलंगणा सरकारमधील मुख्य सचिव शांती कुमारी यांनी शनिवारी ही माहिती दिली. अतिवृष्टीनंतर सरकारकडून राज्यातील ३३ पैकी २९ जिल्ह्यांना पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या आधारे राज्यातील ३३ पैकी २९ जिल्ह्यांना पूरग्रस्त घोषित करण्यात आले आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत कार्यासाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे मुख्य सचिव शांती कुमारी म्हणाल्या. तसेच पूरग्रस्तांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्राण गमावलेल्या २९ लोकांची माहिती पाठवण्यास सांगितले आहे.
शांती कुमारी यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत टेलिकॉन्फरन्समध्ये त्यांच्याकडून अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. सोमवारी दुपारपूर्वी सविस्तर अहवाल सादर करण्यास शांती कुमारी यांनी सांगितले आहे. यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी सोमवारी मदत आणि पुनर्वसन उपायांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, राज्य सरकारने पाऊस आणि पुरामुळे ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
शुक्रवारी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही तेलंगणाला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. शुक्रवारी त्यांनी पूरग्रस्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला ३,४४८ कोटी रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली. पीक नुकसानीचे मूल्यांकन करून केंद्र योग्य नुकसान भरपाई देईल, असे आश्वासनही केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना दिले.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशात ८ ते ९ सप्टेंबर आणि तेलंगणात ९ ते १० सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केवळ तेलंगणातच नाही तर आंध्र प्रदेशातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशात १७ हजार लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.