29.1 अब्ज डॉलरच्या ‘मालकीण’ करतात पक्षांतर; देशातील सर्वात श्रीमंत महिला भाजपात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 06:45 AM2024-04-09T06:45:36+5:302024-04-09T06:47:25+5:30
आयाराम गयारामांच्या यादीत सावित्री जिंदाल
राकेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : लोकसभा निवडणुकीचं रण प्रचंड तापले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत आयाराम- गयारामांची चलतीही सुरू झाली आहे. त्याला हरयाणासारखे छोटे राज्यही कसे अपवाद राहणार?. ८४ वर्ष वय असलेल्या आणि तब्बल २९.१ अब्ज डॉलरच्या ‘मालकीण’ आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा भाजप प्रवेश म्हणूनच चर्चेचा विषय ठरला आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमांची घोषणा झाल्यानंतर आणि निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची परंपरा यंदाही कायम आहे. आयाराम-गयारामांचा सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसत आहे. पक्षातून दिग्गज नेत्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ‘मोदी परिवारात’ जाणे पसंत केले आहे. यातील विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच सावित्री जिंदाल यांचा मुलगा आणि उद्योगपती नवीन यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुलाच्या पावलावर पाऊल ठेवत सावित्री जिंदाल भाजपवासी झाल्या आहेत.
अमेरिकेपासून चिलीपर्यंत...
उद्योग क्षेत्रात जिंदाल समुहाचे नाव ‘टॉप’ ला आहे. ओपी जिंदाल
समूहाचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे. लोखंड, ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, गुंतवणूक आणि पेंट आदी क्षेत्रामध्ये जिंदाल समूहाचा व्यवसाय आहे.
देशातच नव्हे तर भारताबाहेरही त्यांचा व्यवसाय आहे. अमेरिका, यूरोप आणि यूएईपासून चिलीपर्यंत त्यांचा कारभार विस्तारला आहे. सावित्री जिंदाल हिसार येथील रहिवासी आहेत. सावित्री जिंदाल यांचा जन्म २० मार्च १९५० साली आसाममधील तिनसुकिया येथे झाला. त्यांचे पती ओमप्रकाश जिंदाल हे जिंदाल उद्योग समूह सांभाळत होते.
२००५ मध्ये हरियाणामध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून सावित्री जिंदाल या ग्रुपचे नेतृत्व करत आहेत. त्यांचे पती ओमप्रकाश जिंदाल हे हुड्डा सरकारमध्ये मंत्रीदेखील होते. सावित्री जिंदाल यांनीही हिसारमधून विधानसभा निवडणूक लढवली होती.
चिरंजीव नवीन जिंदाल २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कुरुक्षेत्रातून पहिल्यांदा खासदार बनले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्रातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
अब्जाधीशांच्या यादीत स्थान
nयावर्षी ‘फोर्ब्स इंडिया’च्या यादीनुसार सावित्री जिंदल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. सावित्री जिंदल यांची संपत्ती २९.१ अब्ज डॉलर आहे. जागतिक स्तरावर, सावित्री या जगातील अब्जाधीशांच्या यादीत ५६ व्या स्थानी आहेत.
nब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, सावित्री जिंदल यांची एकूण संपत्ती २५ अब्ज डॉलर (२०८४ लाख कोटी रुपये) वर पोहोचली आहे. गेल्या २ वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. २०२० मध्ये फोर्ब्सच्या यादीत ३४९व्या स्थानावर होत्या. यानंतर, सन २०२१ मध्ये २३४ व्या व २०२२ मध्ये ९१व्या क्रमांकावर होत्या.