2G स्पेक्ट्रम निकाल; सीबीआयच्या भूमिकेवर केजरीवाल यांचे प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 04:09 PM2017-12-21T16:09:59+5:302017-12-21T16:15:26+5:30
या घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
नवी दिल्ली- सर्व देशाला हादरवून टाकणाऱ्या आणि संपुआ सरकारच्या पतनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आज विशेष सीबीआय न्यायालयात निकाल लागला. न्यायालयाने माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना पुराव्याअभावी मुक्त केले आहे.
या घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी ट्वीट करुन थेट सीबीआयच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात," टू जी स्पेक्ट्रम घोटाळा सर्वात मोठा घोटाळा होता, संपुआ सरकार याच घोटाळ्यामुळे पडले. आज सर्व आरोपी दोषमुक्त ठरवले गेले, सीबीआयने या खटल्याची दिशा बदलली ? जाणूनबुजून ? लोकांना याचं उत्तर हवं आहे"
2G scam is one of the biggest scams. It rocked the country n was one of the reasons for UPA’s downfall. Today everyone goes scot free. Did CBI mess up the case? Intentionally? People need answers
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 21, 2017
अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी सीबीआयला प्रश्न विचारले आहेत. ज्या संपुआ सरकारच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी देशभरात आंदोलन केले होते त्या सरकारमधील काँग्रेसह अनेक घटक पक्षांबरोबर अनेक वेळा एकाच व्यासपिठावर केजरीवाल गेले आहेत इतकेच नव्हे तर दिल्लीमध्ये काँग्रेसबरोबर सरकारही त्यांनी स्थापन केले होते. आता भाजपाला देशात पराभूत करण्यासाठी विविध वेळेस या संपुआच्या घटकपक्षाबरोबर एकत्र येऊन भाजपावर टीकाही करतात. टू जी घोटाळ्यात आरोपी दोषमुक्त झाल्याने काँग्रेस आनंद व्यक्त करत असताना केजरीवाल कोणती ठोस भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच असा घोटाळा झालाच नाही असे काँग्रेस सुचवत असताना केजरीवाल यांच्या आप पक्षाचे मत काय असेल याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांना लागली आहे.